कळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे, खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, तळोजा या परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यात कामोठे येथे शनिवारपर्यंत ९९ रुग्ण आढळल्याने हा परिसर कोरोनाच्या हॉटस्पॉटवर आला आहे. भविष्यात आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कामोठे, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल परिसरातील राहणारे आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे अनेकांना कामाच्या ठिकाणी लागण झाल्याचे समोर येत आहे.मुंबई पोलीस, बेस्ट कर्मचारी, मुंबई महापालिका क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, एसटी महामंडळ कर्मचारी हे पनवेल परिसरातून ये-जा करतात. या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांच्या संपर्कात कोरोनाबाधित आल्यामुळे कोरोना योद्धेच कोरोनाच्या जाळ्यात अडकत आहेत. यात कामोठे परिसरातील सर्वांत जास्त म्हणजे आतापर्यंत ९९ जणांना लागण झाली आहे. कोमोठे येथे ५० कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर कामोठे परिसर महापालिकेकडून कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.परिसरातील अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना सोडून इतर रहिवाशांना बाहेर जाण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. परिसरातील रहिवाशांनी संचारबंदीचे पालन करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकरिता महापालिकेकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही अनेक नागरिक या आदेशाचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे.
CoronaVirus News in Navi Mumbai : कामोठे ठरतेय कोरोनाचा हॉटस्पॉट; ९९ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 5:52 AM