CoronaVirus News in Navi Mumbai : प्रसूती झालेल्या मातेची कोरोनावर मात; कोविड सेंटरमध्ये मुलीचा जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 03:53 AM2020-05-21T03:53:21+5:302020-05-21T03:53:37+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : घणसोली घरोदा एफ टाईप अपर्णा गरुडे यांना प्रसुतीपूर्व चाचण्यांसाठी रुग्णालयात ये- जा करताना लागण झाली होती. पती मंदारचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : जिद्दीने कोरोनावर मात होऊ शकते हे घणसोली येथील महिलेने दाखवून दिले आहे. प्रसूतीच्या दिवशीच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. यामुळे कोरोनावर उपचार व प्रसूती हे एकाच वेळी करण्याचा प्रसंग महिलेसह डॉक्टरांपुढे निर्माण झाला होता. त्या सर्वांवर मात करून या मातेने स्वत: कोरोनामुक्त होऊन नवजात बालकालाही त्याची लागण होण्यापासून वाचवले.
घणसोली घरोदा एफ टाईप अपर्णा गरुडे यांना प्रसुतीपूर्व चाचण्यांसाठी रुग्णालयात ये- जा करताना लागण झाली होती. पती मंदारचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दोन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर प्रसूतीच्या एक दिवस आधी तिसऱ्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यांची नऊ वर्षाची मुलगी वार्णिका गावी असल्याने तिच्यावरील हे संकट टळले. आलेल्या संकटावर धाडसाने मात करण्याचा निश्चय दोघांनी केला. यावेळी पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनीही त्यांना धीर देत कोरोनावर उपचार व प्रसूती दोन्ही काळजीपूर्वक होतील याचा विश्वास दिला. पती मंदार यांना सीबीडी येथे क्वारंटाईन केले. यामुळे कसोटीच्या प्रसंगात पती पत्नीची ताटातूट झाली.
प्रसूती काळात अपर्णा यांना कोरोना असल्याने प्रसूती पूर्वी आणि नंतर दहा दिवस ठराविक डॉक्टर व नर्स यांचेच काही क्षणासाठी दर्शन घडत होते. वैद्यकीय पथकाने पुरेशी काळजी घेत त्यांची प्रसूती केल्यानंतर तात्काळ, नवजात मुलीला त्यांच्यापासून दूर करण्यात आले. त्यानंतर थेट अकरा दिवसांनीच कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बाळाला डोळे भरून पाहता आले.
डॉक्टर, नर्सचे मोठे सहकार्य
आलेल्या संकटावर धाडसाने मात करण्याचा निश्चय दोघांनीही केला. त्यामुळे औषधांसह पौष्टिक अन्न, मनाचा समतोल राखणे यावर भर दिला. परिचयाच्या व्यक्तींकडून व डॉक्टरांकडून मिळालेल्या प्रेमामुळे रुग्णालयात दाखल झाल्यापासून सोसलेला सर्व त्रास क्षणात विसरून गेल्याचे अपर्णा यांनी सांगितले.