CoronaVirus News : नवी मुंबईने गाठला दहा हजारांचा टप्पा , १२५ दिवस अविरत संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 12:27 AM2020-07-16T00:27:09+5:302020-07-16T00:27:49+5:30

नवी मुंबईमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. फिलीपाइन्सवरून आलेल्या नागरिकाला कोरोनाची लागण झाली. त्याच्यापासून त्याचे इतर सहकारी व वाशीमधील एका कुटुंंबातील जवळपास सात जणांना लागण झाली.

CoronaVirus News: Navi Mumbai reaches the stage of ten thousand, 125 days of uninterrupted struggle | CoronaVirus News : नवी मुंबईने गाठला दहा हजारांचा टप्पा , १२५ दिवस अविरत संघर्ष

CoronaVirus News : नवी मुंबईने गाठला दहा हजारांचा टप्पा , १२५ दिवस अविरत संघर्ष

googlenewsNext

- नामदेव मोरे

नवी मुंबई : सुनियोजित शहराचा बहुमान मिळविलेल्या नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १०,२७३ झाली आहे. १२५ दिवसांमध्ये दहा हजारांचा टप्पा पूर्ण झाला. आतापर्यंत ३१८ जणांना प्राण गमवावे लागले असून, प्रसार रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. अपयश झाकण्यासाठी शासनाने आयुक्तांची बदली केली असून, नवीन आयुक्त नवी मुंबई कोरोनामुक्त करण्याचे आव्हान कसे पेलणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबईमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. फिलीपाइन्सवरून आलेल्या नागरिकाला कोरोनाची लागण झाली. त्याच्यापासून त्याचे इतर सहकारी व वाशीमधील एका कुटुंंबातील जवळपास सात जणांना लागण झाली. पहिला रुग्ण सापडल्यानंतर सर्वप्रथम तो आपल्या शहरातील नाहीच, हे दाखविण्याचा खटाटोप काही अधिकाऱ्यांनी केला होता, परंतु दुसºयाच दिवशी रुग्ण सापडलेल्या परिसरात जाणारे रस्ते सील करण्यात आले. रोडसह सर्व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. शहरातही कोरोनाचे आगमन झाले असल्यामुळे, महानगरपालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. यानंतर, देशभर लॉकडाऊन सुरू झाला, परंतु त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी नवी मुंबईमध्ये झाली नाही. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती व शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रीची दुकाने सुरूच राहिली. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली व कोरोना रुग्णांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढतच गेली. ४३ दिवसांनी २४ एप्रिल रोजी कोरोना रुग्णांचे पहिले शतक पूर्ण झाले. पहिला रुग्ण सापडल्यानंतर ६४ दिवसांनी १ हजाराचा टप्पा पूर्ण झाला. त्यानंतर, रुग्णांची वाढ झपाट्याने होत गेली व १५ जुलैला रुग्णांचा आकडा दहा हजार झाला आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. रुग्णांची संख्या पाच हजार झाल्यानंतर, २३ जूनला मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची शासनाने बदली केली, परंतु महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करून बदली थांबविली. यानंतर, १४ जुलैला रुग्णसंख्या दहा हजारांच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर पुन्हा त्यांची बदली करण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये महापालिकेच्या कागदावर रुग्णांसाठी पुरेशी व्यवस्था आहे, परंतु प्रत्यक्षात रुग्णालयामध्ये जागा उपलब्ध होत नाही. आयसीयू युनिटची संख्या कमी आहे. आॅक्सिजनची व्यवस्था असणाºया बेडची संख्याही कमी पडत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांवर पोहोचले असले, तरी कोरोनाबळींचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता वाढत आहे. नवीन आयुक्त अभिजीत बांगर कशा प्रकारे ही परिस्थिती हाताळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागरिकांचाही निष्काळजीपणा : नवी मुंबईमधील अनेक नागरिक लॉकडाऊनच्या नियमांचे कोटेकोर पालन करत आहेत. स्वत:च्या व कुटुंबीयांची काळजी घेत आहेत, परंतु जवळपास ३० टक्के नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. मास्क, सॅनिटायझर व सुरक्षेसाठीच्या इतर उपाययोजनांचा अवलंब करत नाहीत. नियम धाब्यावर बसविणाऱ्यांचा फटका नियम पाळणाºयांनाही बसत आहे. सर्व भार शासन व प्रशासनावर टाकून निष्काळजीपणा करणाºयांमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी न होता, वाढतच चालली आहे.

उपाययोजना आहेत, अंमलबजावणी नाही
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने अनेक उपाययोजना केल्या. नवीन रुग्णालय उभे केले. खाससी रुग्णालयांची मदत घेतली जात आहे. लॉकडाऊन सुरू केला आहे, परंतु लॉकडाऊनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक असल्याचे सांगितले जाते,
परंतु प्रत्यक्षात कोरोना झालेल्या रुग्णांना वेळेत रुग्णालयात भरती केले जात नाही. आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. अनेक चांगले निर्णय घेण्यात आले, परंतु त्यांची ठोस अंमलबजावणी केली नाही. यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही.

मुंबई बाजारसमितीची डोकेदुखी
नवी मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबई बाजारसमितीमुळे वाढले आहेत. मुंबई व नवी मुंबईमधील नागरिकांना जीवनाश्यक वस्तंूचा पुरवठा करता यावा, यासाठी बाजारसमिती सुरू ठेवली आहे. शहरात लॉकडाऊन आहे, परंतु बाजारसमितीमध्ये रोज २५ ते ३० हजार नागरिकांची गर्दी होत आहे. खरेदीसाठी मुंबईच्या कानाकोपºयातून ग्राहक येत आहेत. बाजारसमिती सुरू असल्यामुळे शहरातील लॉकडाऊनला काहीही अर्थ राहिलेला नाही.

शहरातील कोरोनाची स्थिती
एकूण चाचणी - २७,२४९
एकूण निगेटिव्ह - १६,४१४
रुग्ण - १०,२७३
मृत्यू - ३१८
कोरोनामुक्त - ६,३५०
उपचार सुरू - ३,६५०
होम क्वारंटाईन - ५५,९६३
क्वारंटाईन पूर्ण - ६६,९४८

महानगरपालिकेने केलेली व्यवस्था
रुग्णालय प्रकार बेडक्षमता वापर शिल्लक
कोविड केअर सेंटर २,१५४ ७७६ १,३७८
कोविड हेल्थ सेंटर ७८३ ७५७ २६
डेडिकेटेड हॉस्पिटल ३७० २५३ ११७

प्रतिहजार रुग्णवाढीसाठी
लागणारे दिवस
रुग्णसंख्या दिनांक कालावधी
१ हजार १५ मे ६४
२ हजार ३० मे १५
३ हजार ९ जून १०
४ हजार १७ जून ८
५ हजार २३ जून ६
६ हजार २७ जून ४
७ हजार २ जुलै ५
८ हजार ७ जुलै ५
९ हजार ११ जुलै ४
१० हजार १५ जुलै ४

Web Title: CoronaVirus News: Navi Mumbai reaches the stage of ten thousand, 125 days of uninterrupted struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.