CoronaVirus News in Navi Mumbai : सहा दिवसांपासून मृतदेह ताब्यात मिळण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 01:09 AM2020-05-18T01:09:33+5:302020-05-18T01:09:52+5:30
CoronaVirus News in Navi Mumbai : वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच विशेष परवानगी घेऊन बीड येथून आलेल्या दोन मुली प्रवास परवान्याची मुदत संपल्याने अंत्यसंस्कार न करताच रविवारी आपल्या मूळ गावी परतल्या.
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचारादरम्यान तुर्भे येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा हदयविकाराने मृत्यू झाला. परंतु कोरोना चाचणी अहवाल आला नसल्याचे कारण देत संबंधित विभागाने मागील सहा दिवसांपासून मृतदेहाचा ताबा नातेवाईकांना दिला नसल्याचा प्रकार समोर आला आहे. वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच विशेष परवानगी घेऊन बीड येथून आलेल्या दोन मुली प्रवास परवान्याची मुदत संपल्याने अंत्यसंस्कार न करताच रविवारी आपल्या मूळ गावी परतल्या.
तुर्भे विभागात सेक्टर २0, २१ आणि सेक्टर २२ येथील बैठ्या चाळीत कोरानाचा चांगलाच प्रादुर्भाव वाढला आहे. १२ मे रोजी येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला पालिकेच्या वाशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. चाचणीनंतर तीन दिवसांनी मृतदेह ताब्यात दिले जाईल, असे रुग्णालय व्यवस्थापनाने नातेवाईकांना सांगितले. परंतु सहा दिवस झाले तरी मृतदेह ताब्यात दिला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
याच चाळीच्या दुसऱ्या टोकाच्या रुममध्ये राहणाºया एका महिलेला श्वसनाचा त्रास होवू लागल्याने तिला तीन दिवसांपूर्वी रूग्णालयात दाखल केले होते. तिचा रविवारी मृत्यू झाला. तिचा अहवाल निॅगेटीव्ह आल्याने दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मात्र, मृत होवून सहा दिवस उलटले तरी कोरोना चाचणी अहवाल का आला नाही. अहवाल येण्यासाठी नक्की किती दिवस लागतात. रूग्णाचा मृत्यू झाला असताना, विशेष बाब म्हणून एक दोन दिवसांत अहवाल येणे अपेक्षित आहे, असे असतानाही अहवाल येण्यासाठी इतका विलंब का याची चौकशी करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.