CoronaVirus News: कुटुंब सर्वेक्षणात राज्यात नवी मुंबईचीच बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 12:44 AM2020-10-04T00:44:24+5:302020-10-04T00:45:00+5:30
CoronaVirus Navi Mumbai News: मुख्यमंत्र्यांनीही केले कौतुक; १ लाख ६३ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण; पाच लाख नागरिकांची तपासणी
- नामदेव मोरे
नवी मुंबई : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यामध्येही राज्यात नवी मुंबईने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत १ लाख ६३ हजार ८०८ कुटुंबांचे सर्वेक्षण पुर्ण झाले असून, तब्बल ५ लाख २२ हजार ४९३ नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. ११ हजार ५५९ सहव्याधी असणाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. मनपाच्या या कामाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कौतुक केले आहे.
राज्यात सर्वत्र १४ आॅक्टोबरपासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान सुरू झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनेही प्रभावीपणे हे अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी यासाठी ७२० पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकामध्ये २ ते ३ कर्मचारी व स्वयंसेवकांचा समावेश आहे. या पथकांच्या माध्यमातून शहरातील ५ लाख ३८हजार ३२ घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या दिवसापासून या अभियानाला गती देण्यात आली आहे. प्रत्येक घरामध्ये जाऊन नागरिकांची आॅक्सिजन व तापमान तपासले जात आहे. सहव्याधी असल्यास त्याचीही नोंद करून घेतली जात आहे. नागरिकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती केली असून, सर्वेक्षण केलेल्या घरावर स्टिकर लावण्यात येत आहे. २ आॅक्टोबरपर्यंत शहरातील १ लाख ६३ हजार ८०८ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात यश आले असून, तब्बल ५ लाख २२ हजार ४९३ नागरिकांची तपासणी केली आहे. यामध्ये सारीचे ३५४ व सहव्याधी असलेल्या ११,५५९ नागरिकांची नोंद झाली आहे. २ लाख ६९ हजार १४२ पुरुष व २ लाख ५३ हजार ३५१ महिलांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
पहिल्या दिवसापासून नवी मुंबई महानगरपालिका सर्वेक्षणात आघाडी घेतली आहे. आयुक्तांनी यासाठी प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रांना सर्वेक्षणासाठी नियोजन करून दिले आहे. प्रत्येक केंद्राला प्रतिदिन सर्वेक्षणाचे उद्दिष्ट देऊन त्याची योग्य अंमलबजावणी करून घेतली जात आहे. नियोजनाप्रमाणे काम होत आहे का, याचाही नियमित आढावा घेतला जात आहे. नागरी आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी व सर्वेक्षण करणाºया पथकामधील कर्मचारीही मनापासून परिश्रम घेत असून, सर्वांच्या मेहनतीमुळेच नवी मुंबईने सर्वेक्षणात आघाडी घेतली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविले जात असून, तेही नियमित आढावा घेत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, मुंबईपेक्षाही नवी मुंबईमध्ये अधिक गतीने सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.
माझे कुटुंब सर्वेक्षण
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी ७२० पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकामध्ये २ ते ३ कर्मचारी व स्वयंसेवक उपलब्ध करून सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. पहिल्या दिवसापासून प्रभावीपणे सर्वेक्षणाचे काम करण्यात येत आहे. प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी या माध्यमातून करण्यात येत आहे.
- अभिजीत बांगर, आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका
महानगरपालिकानिहाय २ आॅक्टोबरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा तपशील
महानगरपालिका कुटुंब घरातील सदस्य सारी सहव्याधी
जळगाव १७२१५ ६४३८२ २५ ८७३
अकोला १५९६६ ६२१६९ ३४ ६४३
पनवेल १३३१ ० १२ ७०८
लातूर ३८० १६०० ५९ ८२
धुळे ५३० २२९६ १ १
अहमदनगर ५४८९ २०९३४ १११ ३१२
चंद्रपूर ७६१६ १९४५२ ५२ ४३०
परभणी १०६९० ४६२२३ २ १९६
महानगरपालिका कुटुंब घरातील सदस्य सारी सहव्याधी
नवी मुंबई १६३८०८ ५२२४९३ ३५४ ११५५९
मुंबई १४७२६३ ५००१५५ ६१६ १४३०१
पुणे ११००७२ ३१३३२७ ११३ १२०४०
नागपूर १९६२७ ७३१४५ २२ ११६४
ठाणे १६०२६९ ५०८२८८ २११ ६७६३
पिंपरी चिंचवड १३८१५४ ४०८०६७ ७७५ ६६११
वसई विरार ६४७३ २३६८९ ४० १८४
नाशिक ५५०५ २१९९७ ४८ १३०८
कल्याण डोंबिवली १२२०७ ३३५४३ ३२ ६८५
औरंगाबाद ५६२० २१४४९ ४२ ३११
सोलापूर २३३४९ ९८१६८ १५ २६८०
मिरा भार्इंदर ७८६७४ २६३०७४ १४९४ ४७०९
भिवंडी ३६४७ १३८११ ३ ७५
अमरावती २४८१८ ९८२७६ ९७ १८७५
मालेगाव २०८८५ ११२५६३ ३३ ३४८
नांदेड ८०५ २८३४ ५ २७
कोल्हापूर ११४०१ ४४२६५ १७ २२६७
उल्हासनगर २८८५ ८५७४ १९ ११२
सांगली ३८५६५ १५२४३० १२३ ५६१६