- वैभव गायकरपनवेल : पनवेल महापालिका क्षेत्र तसेच ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४०० च्या पुढे गेला आहे. हा आकडा वाढत चालला असला तरी कोरोनामुक्त रुग्णांची वाढती संख्याही दिलासादायक आहे. आतापर्यंत पनवेलमधील २०० हून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांचा आकडा ३१८ आहे. यापैकी १६७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा आकडा १२८ झाला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ५३ आहे. तर ३ जणांचा ग्रामीण भागात मृत्यू झाला आहे. मात्र, बरे होणाऱ्या रुग्णांचा वाढती संख्या ही पनवेलकरांसाठी दिलासादायक आहे.
पनवेल महापालिका हद्द व ग्रामीण भागातील बºया झालेल्या रुग्णांची संख्या २२० आहे. पनवेलमध्ये उपजिल्हा रुग्णालय तसेच एमजीएम रुग्णालयाला कोविडचा दर्जा देण्यात आला आहे. शेकडो रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. शेकडोंच्या संख्येने परिचारिका, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी रात्रन्दिवस कार्यरत आहेत. रुग्णांना बरे करण्यासाठी हे योद्धे आपला जीव धोक्यात टाकत आहेत.अशा परिस्थितीत नागरिकांनी योद्ध्यांना साथ देण्याची गरज आहे. पनवेल परिसर रेडझोनमध्ये येत असल्याने नागरिकांनी लॉकडाउन व सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केल्यास कोरोनाविरुद्धच्या लढ्यावर मात करणे नक्कीच शक्य होणार आहे.पनवेलमध्ये कोरोनाची साथ नियंत्रणात आहे. या साथीवर नियंत्रण ठेवणे यालाच प्राधान्य असणार आहे. यापूर्वीच्या आयुक्तांनी चांगले काम केले आहे. तेच काम आम्हीच पुढे चालू ठेवू. पनवेलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.- सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका