CoronaVirus News: रुग्णांना परत मिळाले एक कोटी; अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या रुग्णालयांना दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 12:34 AM2020-10-10T00:34:04+5:302020-10-10T00:34:43+5:30
CoronaVirus Navi Mumbai News: बिले तपासणारी नवी मुंबई एकमेव महापालिका
नवी मुंबई : रुग्णांची लुबाडणूक करणाºया रुग्णालय व्यवस्थापनांना महानगरपालिकेने दणका दिला आहे. आतार्यंत १ कोटी ३६ लाख रुपये नागरिकांना परत मिळवून दिले आहेत. तक्रारी न आलेली बिलेही तपासण्यात आली असून, सर्व बिले तपासणारी नवी मुंबई एकमेव महानगरपालिका ठरली आहे.
कोरोनाची महामारी सुरू झाल्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने बिलांची आकारणी केली जाऊ लागली होती. रुग्णालयांकडून होणाºया लुबाडणुकीविषयी अनेकांनी महानगरपालिकेकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली होती. मनसे व इतर पक्षांनीही याविषयी आवाज उठविला होता. या प्रकाराची दखल आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेऊन, खासगी रुग्णालयांनी शासनाच्या नियमावलीप्रमाणेच बिलांची आकारणी करावी, असे आदेश सर्व व्यवस्थापनांना दिले होते. लुबाडणूक थांबविण्यासाठी तक्रार निवारण केंद्र सुरू केले. बिलांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. महानगरपालिकेकडे आलेल्या तक्रारीची २४ तासांत दखल घेण्यास सुरुवात झाली. याशिवाय आयुक्तांनी मार्चपासूनची सर्व बिले तपासण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तक्रारी न आलेली बिलेही तपासण्यास सुरुवात झाली व रुग्णांकडून अतिरिक्त घेतलेले शुल्क परत करण्यास सुरुवात झाली.
महानगरपालिकेने १३ सप्टेंबरपर्यंत ३२ लाख ३२२ रुपये नागरिकांना परत मिळवून दिले होते. त्यानंतरच्या काळात कोरोना तक्रार निवारण केंद्रातील हेल्पलाइन नंबर व व्हॉट्सअप अॅपवर प्राप्त झालेल्या तक्रारींची छाननी करून १२ रुग्णालयांना ४१ लाख ३८ हजार ७९७ रुपये परत करण्यास लावले. महानगरपालिकेने सर्व रुग्णालयांमधील मार्चपासूनची बिले तपासण्यासाठी ६ विशेष पथके तयार केली होती. या पथकांनी ८१२ पैकी आतापर्यंत ६६२ देयकांची तपासणी केली. रुग्णांकडून ६२ लाख ८८ हजार ८२३ रुपये अतिरिक्त स्वीकारल्याचे निदर्शनास आले असून, संबंधित पाच रुग्णालयांना सदर रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोरोना रुग्णांवरील उपचार पद्धती व आकारल्या जाणाºया देयक रकमांवर नियंत्रण ठेवण्याविषयी निर्देश प्रशासनास दिले आहेत. २१ मे व ३१ आॅगस्टला शासनाने अधिसूचना काढून खासगी रुग्णालयांनी उपचार करताना किती बिल आकारावे, याविषयी दर निश्चित करून दिले आहेत. या आदेशाचे पालन करण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
‘लोकमत’चे यश
खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लुबाडणूक होत असल्याचे ‘लोेकमत’ने निदर्शनास आणून दिले होते. ४ सप्टेंबरला रिअॅलिटी चेकच्या माध्यमातून शहरातील रुग्णालयांमधील सद्यस्थिती निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर, सातत्याने या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. याची दखल घेऊन प्रशासनाने लुबाडणूक थांबविण्यासाठी तक्रार निवारण समिती व लेखा परीक्षण सुरू केले होते.
महापालिका तक्रार निवारण कक्ष
महानगरपालिकेने बिलांविषयी असणाºया तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष तयार केला आहे. २७५६७३८९ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करता येते. याशिवाय ७२०८४९००१० हा व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी काही तक्रारी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय स्वतंत्र विशेष लेखा परीक्षण पडताळणी समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून सर्व बिलांची पडताळणी केली जात असून, अशा प्रकारे सर्व बिले तपासणारी नवी मुंबई एकमेव महानगरपालिका आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या दरपत्रकाप्रमाणेच बिलांची आकारणी करणे बंधनकारक आहे. पडताळणीदरम्यान विसंगती केल्याचे आढळून आल्यास व त्यामधून रुग्णाची आर्थिक पिळवणूक होत असल्यास, अशा रुग्णालयांवर साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियमान्वये आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलमान्वये आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- अभिजीत बांगर, आयुक्त, मनपा
रुग्णालयनिहाय परतावा रक्कम
रूग्णालय परतावा
तेरणा हॉस्पिटल नेरुळ १९ लाख ६४ हजार
डॉ. डी.वाय. पाटील नेरुळ ६ लाख ३६ हजार
पी. के. सी. रुग्णालय वाशी ३ लाख ४२ हजार
फोर्टीज हॉस्पिटल वाशी २ लाख ५० हजार
अपोलो हॉस्पिटल बेलापूर २ लाख २७ हजार
रिलायन्स कोपरखैरणे १ लाख ४२ हजार
न्युरोजन सीवूड १ लाख ३७ हजार ४२९
फ्रीझॉन घणसोली १ लाख २६ हजार
ग्लोबल हेल्थ केअर वाशी १ लाख १५ हजार २०२
सिद्धिका कोपरखैरणे १ लाख १४ हजार
एमजीएम सीबीडी ५६ हजार १६१
इंद्रावती ऐरोली २९ हजार
मनपाने स्वत: दिलेला परतावा
रुग्णालय परतावा
फोर्टिज वाशी १७ लाख ८६ हजार ४२५
फ्रिझॉन घणसोली १४ लाख ४१ हजार ३३५
सनशाइन नेरुळ १२ लाख ३२ हजार २७२
एमजीएम वाशी ७ लाख ३७ हजार ८५१