CoronaVirus News: कोरोनाची लक्षणं आहेत, पण कोरोना नाही; वेगळ्याच 'केसेस'मुळे चिंता वाढली
By कुणाल गवाणकर | Published: October 23, 2020 09:09 AM2020-10-23T09:09:15+5:302020-10-23T09:09:33+5:30
CoronaVirus Navi Mumbai News: रुग्णांचं प्रमाण वाढतंय; कोरोनाची लक्षणं असूनही चाचण्या मात्र निगेटिव्ह
नवी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून देशात आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील स्थितीही हळूहळू सुधारताना दिसत आहे. कोरोनाची लक्षणं आढळताच योग्य वेळी करण्यात येणाऱ्या चाचण्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वेगळीच प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची चिंता वाढली आहे.
नवी मुंबईतील एक वृद्ध व्यक्ती श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात पोहोचली. या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली नाही. मात्र त्यांच्या शरीरात कोरोनाची लक्षणं दिसून येत होती. हाय रेजॉल्यूशन सीटी स्कॅनमध्ये त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकार यंत्रणा कोरोनाच्या विषाणूशी लढत असल्याचं दिसून आलं. त्यांच्या फुफ्फुसांच्या तपासणीतूनही तसे संकेत मिळाले.
डॉक्टरांनी संबंधित व्यक्तीची दोन वेळा कोरोना चाचणी केली. त्यातून कोरोनाची लागण झाली नसल्याचं निदान झालं. आपण फेब्रुवारी-मार्चमध्ये वाराणसीसह इतर धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर काही दिवस ताप आला होता, अशी माहिती संबंधित व्यक्तीनं डॉक्टरांना दिली. त्यातून डॉक्टरांनी त्या व्यक्तीला कोरोना होऊन गेल्याचा निष्कर्ष काढला. डॉक्टरांनी त्यांनी स्टेरॉईड्स आणि इनहेलर दिलं.
जूनमध्ये अशा प्रकारचं पहिलं प्रकरण डॉक्टरांकडे आलं होतं. मात्र आता अशी आणखी प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. आतापर्यंत कधीही कोरोना न झालेल्या व्यक्ती कोरोनाच्या लक्षणांसह रुग्णालयांत येत आहेत. खोकला, ताप आला होता. तो दोन-तीन दिवसांत बरा झाला, असं या व्यक्ती डॉक्टरांना सांगत आहेत.
शरीरात अँटीबॉडी आढळल्या
दुसऱ्यांदा लक्षणं आढळून आल्यानं या रुग्णांच्या आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्या निगेटिव्ह आल्या. मात्र अँटीबॉडी चाचण्यांमध्ये कोरोनाचा विषाणू आढळून आला. नवी मुंबईतल्या अपोलो रुग्णालयात कंसल्टंट पल्मनॉलजिस्ट असलेल्या डॉ. जयलक्ष्मी टिकेंनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे असे ३० रुग्ण आले आहेत. यातल्या बहुतांश रुग्णांना श्वास घेण्यात अडचणी येत आहेत. त्यांना फुफ्फुसाशी संबंधित त्रास होत आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी यातल्या बऱ्याच जणांना ताप आला होता.