CoronaVirus News : बेडसाठी होतोय दबावाचा वापर, रुग्णालय व्यवस्थापन हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 12:20 AM2021-04-14T00:20:18+5:302021-04-14T00:20:42+5:30
CoronaVirus News: दुसऱ्या रुग्णाच्या जीविताशी खेळ करत मर्जीतल्या रुग्णाला बेड मिळविण्यासाठी इतर रुग्णांना हलवण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
नवी मुंबई : शहरातील वाढत्या कोरोना रुग्णामुळे उपलब्ध सुविधांवर ताण पडू लागला आहे. परिणामी रुग्णाला उपचार मिळवण्यासाठी दबावानंतरचा वापर होत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. दुसऱ्या रुग्णाच्या जीविताशी खेळ करत मर्जीतल्या रुग्णाला बेड मिळविण्यासाठी इतर रुग्णांना हलवण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
नवी मुंबईत कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सद्य:स्थितीला नवी मुंबईत ११ हजारांच्या जवळपास कोविड रुग्णांवर रुग्णालयात तसेच घरी उपचार सुरू आहेत, तर बहुतांश रुग्णांची दिवसेंदिवस प्रकृती खालावत असल्याने खासगी रुग्णालयात देखील बेड मिळणे अवघड होत आहे. परिणामी राजकीय तसेच इतर व्यक्तींचा दबाव वापरून मर्जीतल्या रुग्णाला बेड मिळवण्याचे प्रकार घडू लागले आहेत. यासाठी अगोदरच ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यासाठी देखील दबाव टाकला जात आहे. असाच प्रकार सोमवारी रात्री कोपरखैरणे येथील एका खासगी रुग्णालयात घडला. तिथे उपचार घेत असलेल्या रुग्णाला ऑक्सिजनवरून हलवून त्याठिकाणी नव्याने एका रुग्णाला दाखल करून घेण्याचा दबाव टाकला जात होता. रुग्णालय व्यवस्थापनाकडून असे करण्यास नकार दिला जात असतानाही, रुग्णाचे नातेवाईक राजकीय ताकद वापरून त्याठिकाणी बेड मिळवण्याच्या प्रयत्नात होते. हा प्रकार अगोदरच उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईक व मित्रांच्या निदर्शनास आला. त्यांनी आपल्या रुग्णाला उपचार सुरू असलेल्या वॉर्डमधून हलवण्यास विरोध दर्शवला. अखेर नव्याने भरती झालेल्या रुग्णासाठी रुग्णालयाने स्वतंत्र सोय करून राजकीय दबावातून स्वतःची सुटका करून घेतली.
आयसीयू बेड कमी
शहरात खासगी व पालिका रुग्णालयात आयसीयू बेडची उपलब्धता कमी पडू लागल्याने असे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात कोरोना रुग्णांची वाढ होतच राहिल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.