- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल महापालिका आरोग्य विभागाकडून शहरातील शिल्लक बेडची माहिती मिळत नसल्याने कोणत्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत, यासाठी गोंधळ उडत आहे. त्यामुळे ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड मिळविण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांची अक्षरश: धावपळ होत आहे.पनवेल पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज पाचशेच्या जवळपास रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीने नागरिक हैराण झाले आहे, आता भीती निर्माण झाली आहे. त्यातच रुग्णाच्या उपचाराकरिता बेड शिल्लक असलेली माहिती मिळत नसल्याने कोरोना रुग्णांची परवड सुरू झाली आहे, तर कित्येक रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. पनवेल परिसरात शासकीय व खासगी रुग्णालयात कोरोनाबाधितांनसाठी २,८०० बेड उपल्ब्ध आहेत. पनवेल पालिकेत ६०८ ऑक्सिजन बेड, २४३ आयसीयू आणि ८२ व्हेंटिलेटर बेडची सुविधा करण्यात आली आहे. पनवेल परिसरात व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्ण वेटिंग लिस्टमध्ये आहेत. एखादा बेड रिकामा झालाच, तर तो तात्काळ भरला जातो. पनवेल शहरात पालिका क्षेत्र, तसेच ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी पनवेल शहरात येतात. त्यामुळे पनवेल क्षेत्रातील अनेक खासगी रुग्णालयांतील आयसीयू त्याचबरोबर व्हेंटिलेटर बेड फुल होत आहेत. पनवेलकरांना मुंबई, नवी मुंबई येथील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वर्षभरापासून सुरू आहे. कधी थांबणार याची सारेच वाट पहात आहेत.मालकीहक्क असलेले रुग्णालय पालिकेचे नसल्याने खासगी रुग्णालयांच्या खांद्यावर कोरोनाचा कारभार सुरू असल्याची परिस्थिती आहे. पनवेल परिसरात वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन कोविड सेंटर त्याचबरोबर बेडच्या संख्येत वाढ करण्याची गरज निर्माण झाली आहे.पालिकेचा डॅश बोर्ड अपडेट नाहीपनवेल महापालिका आरोग्य विभागाकडून नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या बेडविषयी माहिती देण्यासाठी डॅश बॉर्ड पालिका वेबसाइटवर आहे. या डॅश बोर्डवर २६ रुग्णालयांत आसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड शिल्लक असलेली माहिती नागरिकांना पुरवली जात असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे; परंतु या डॅश बोर्डवर मोजकीच रुग्णालये सक्रिय आहेत, तर इतर रुग्णालयांतील बेडबाबतची माहिती दोन ते तीन दिवस झाले तरी अपडेट करण्यात आलेली नाही. एका हॉस्पिटलने, तर २७ मार्चनंतर बेडची माहितीच दर्शवली नसल्याचे चित्र आहे.टेस्ट रिपोर्ट दिरंगाईमुळे धोकाकोरोनाची हलकी लक्षणे जाणवू लागल्यानंतर कोरोना टेस्ट उपजिल्हा रुग्णालय, आरोग्य केंद्रात करून घेतली जात आहे. याबाबत रिपोर्ट लॅब येथून येण्यास पाच दिवसांचा कालावधी लागत आहे. या पाच दिवसांत रुग्णावर उपचार होत नसल्याने अनेक रुग्णांत कोरोनाची तीव्रता वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्सिजनची शरीरातील मात्रा कमी झाली असता त्यावेळी नातेवाईक बेड शोधण्यासाठी धावाधाव करतात. यासाठी पालिका प्रशासनाने टेस्ट रिपोर्ट तात्काळ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. रुग्णालयांत समन्वयाचा अभाव पनवेल पालिका क्षेत्रात २४३ आयसीयू आणि ८२ व्हेंटिलेटर बेड आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे ते फारच तोडके आहेत. पनवेल परिसरातील २८ खासगी रुग्णालयांतील संपूर्ण व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेड फूल असल्याचे सांगण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांकडून पालिका प्रशासनाला दूर ठेवल्याचे समजते आहे. उपचारादरम्यान रुग्णांना येणाऱ्या समस्या, रुग्ण दाखल करताना पैशांची मागणी, वाढीव बिल याबाबतच्या अनेक समस्या नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत.पनवेल परिसरातील कोविड रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. वेळोवेळी नागरिकांना बेड उपलब्ध करून देण्यात येत आहे. पालिका डॅश बोर्ड अपडेट होत नसेल, तर पाहणी करून तशा सूचना करण्यात येतील.- डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी, पनवेल
CoronaVirus News: पनवेलमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडसाठी पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 1:29 AM