CoronaVirus News: शाळांनी मनमानी फी वसुली बंद करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:35 PM2020-08-12T23:35:14+5:302020-08-12T23:35:32+5:30
व्यवस्थापनांना निवेदन; दरमहा हप्त्याने शुल्क आकारण्याची मागणी
नवी मुुंबई : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक ओढाताण सुरू झाली आहे. त्यामुळे महाविद्यालय आणि विद्यालयांनी मनमानी फी वसुली बंद करून, एकरकमी फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर दबाव आणू नये. फी वर्षभर टप्प्याटप्प्याने स्वीकारावी, अशी मागणी शिवसेना नवी मुंबई शाखेच्या वतीने शहरातील शाळा आणि महाविद्यालय व्यवस्थापनाकडे करण्यात आली आहे.
कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून शाळा आणि महाविद्यालयांचा एकही वर्ग भरलेला नाही. वर्ग बंद असले, तरी शाळा आणि महाविद्यालयांनी फी वसुलीचा मात्र सपाटा लावला आहे. आॅनलाइन शिक्षणाच्या नावाखाली काही शाळांनी जास्त फी घेण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चालू शैक्षणिक वर्षाची फी भरण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने पालकांवर दबाव निर्माण केला असून, याबाबतच्या तक्रारी शिवसेनेकडे आल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शहरातील शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाची भेट घेऊन मनमानी पद्धतीने फी वसुली थांबवण्याच्या सूचना केल्या. पालकांची छळवणूक करून ही फी वसुली सुरू ठेवल्यास, संस्थेच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
कोरोना महामारीमुळे विद्यार्थी घरूनच आॅनलाइन शिक्षण घेत आहेत. मात्र, तरीही काही शाळांनी वार्षिक फीमध्ये ग्रंथालय शुल्क, क्रीडा शुल्क, जलतरण तलावाचे शुल्क आणि अन्य शिक्षणेतर उपक्रमांचे शुल्क पालकांच्या माथी मारले जात असून, ही एक प्रकारची आर्थिक लूट असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. सादर लूट तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.