CoronaVirus News: झोपडपट्टीवासीयांनी रोखला कोरोनाचा प्रादुर्भाव; तुर्भेसह दिघ्यामध्ये रुग्णसंख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 12:53 AM2020-08-09T00:53:42+5:302020-08-09T00:54:01+5:30

घणसोली, ऐरोली व बेलापूर परिसरात बाधितांमध्ये वाढ

CoronaVirus News: Slum dwellers prevent outbreak of corona | CoronaVirus News: झोपडपट्टीवासीयांनी रोखला कोरोनाचा प्रादुर्भाव; तुर्भेसह दिघ्यामध्ये रुग्णसंख्या घटली

CoronaVirus News: झोपडपट्टीवासीयांनी रोखला कोरोनाचा प्रादुर्भाव; तुर्भेसह दिघ्यामध्ये रुग्णसंख्या घटली

Next

नवी मुंबई : शहरातील तुर्भेसह दिघामधील झोपडपट्टीवासीयांनी कोरोना नियंत्रणात आणण्यात यश मिळविले आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या तुर्भे सहाव्या क्रमांकावर गेले आहे. दुसरीकडे सिडको विकसित नोडसह बैठ्या चाळींमध्ये झपाट्याने रुग्णवाढ होत असून, नेरुळसह कोपरखैरणत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. झोपडपट्टीवासीयांएवढी जागरूकताही या परिसरातील नागरिकांना दाखविता आलेली नाही.

नवी मुंबईमधील कोरोनाची आकडेवारी १८ हजारांच्या घरात पोहोचली आहे. महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. काही ठिकाणी नागरिक सहकार्य करत नाहीत, तर काही ठिकाणी मनपाचे अधिकारी योग्य प्रकारे काम करत नाहीत. नवी मुंबईची रचना मूळगाव, सिडको विकसित परिसर व झोपडपट्टी अशी झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर, सुरुवातीला सर्वाधिक रुग्ण तुर्भे झोपडपट्टीमध्ये वाढू लागले होते. जूनअखेरपर्यंत तुर्भे विभाग कार्यालय परिसरात सर्वाधिक रुग्ण होते, परंतु तुर्भे नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने विशेष परिश्रम घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यात यश मिळविले. पहिल्या क्रमांकावर असलेले तुर्भे आता सहाव्या क्रमांकावर आहे. तुर्भे स्टोअर, इंदिरानगर या झोपडपट्टी परिसरातील रुग्णवाढ थांबली आहे. याच पद्धतीने दिघा झोपडपट्टी परिसरातील रुग्णवाढही नियंत्रणात आहे. नवी मुंबईमधील सर्वात कमी रुग्ण दिघा परिसरात आहेत. शहरातील झोपडपट्टी परिसरात प्रादुर्भाव थांबविण्यात यश आले असताना, सिडको विकसित नोडमध्ये मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे.
नवी मुंबई मधील सर्वाधिक रुग्ण नेरुळ परिसरात आहेत. शुक्रवारपर्यंत येथील रुग्णसंख्या ३,२५१ झाली होती. या परिसरातील प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात महानगरपालिकेस पूर्णपणे अपयश आले आहे. या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नाही. मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणारांवरही काहीच कारवाई होत नाही. नेरुळप्रमाणे कोपरखैरणेमधील स्थितीही बिकट आहे. बैठ्या चाळींमध्ये रुग्ण वाढत आहेत. घणसोली, ऐरोली व बेलापूर परिसरातही रुग्णवाढ सुरूच आहे.

तुर्भे पॅटर्न राबविण्यात अपयश
तुर्भे नागरी आरोग्य केंद्र परिसरात कोरोना नियंत्रणात आला आहे. यानंतर, संपूर्ण शहरात तुर्भे पॅटर्न राबविण्याची घोषणा झाली होती. इंदिरानगर, दिघा, कातकरीपाडा नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर व तेथील यंत्रणेने परिश्रम करून कोरोना नियंत्रणात आणला आहे, परंतु इतर ठिकाणी मात्र रुग्णवाढ थांबविता आली नाही.

वाशीमध्येही नियंत्रण
नवी मुंबईमध्ये कोरोनाची सुरुवात वाशी नोडपासून झाली. फिलिपाइन्सवरून आलेल्या नागरिकांमुळे शहरात प्रादुर्भाव सुरू झाला. जवळपास दीड महिना वाशीमधील रुग्णसंख्या सर्वाधिक होती, परंतु सद्यस्थितीमध्ये येथील परिस्थिती नियंत्रणात येत असून, दिघानंतर सर्वात कमी रुग्ण या परिसरात आहेत.

नियम तोडणाऱ्यांवर हवी कठोर कारवाई : झोपडपट्टी परिसरात महानगरपालिकेच्या नियमांचे व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाते. मास्क न वापरणाऱ्यांवरही कारवाई केली जाते. यामुळे तुर्भेसह दिघामधील परिस्थिती नियंत्रणात येत आहे. दुसरीकडे सिडको विकसित नोड विशेषत: बैठ्या चाळीच्या परिसरात नियमांचे उल्लंघन होत आहे. नियम तोडणाºयांवर कडक कारवाई केली, तरच परिस्थिती नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे.

Web Title: CoronaVirus News: Slum dwellers prevent outbreak of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.