Coronavirus: तळोजा कारागृहात नवीन कैद्यांना ‘नो एण्ट्री’; प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 02:08 AM2020-05-09T02:08:00+5:302020-05-09T02:08:45+5:30
तळोजा कारागृहात नवीन कैद्यांना प्रवेश बंद केला असून, नवीन कैदी आल्यास त्याची रवानगी खारघर शहरात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात करण्यात येत आहे.
वैभव गायकर
पनवेल : नवी मुंबईमधील तळोजा मध्यवर्ती कारागृहात नवीन कैद्यांना प्रवेशबंदीचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे. आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्याने तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासन सतर्क झाल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने या ठिकाणी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
कारागृहाची क्षमता २१२४ एवढी आहे. सध्याच्या घडीला २७०० पर्यंत कैदी असून, यात अंडरवर्ल्ड डॉन अबु सालेमचाही समावेश आहे. पनवेल परिसरातही कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने कारागृह अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांनी विविध उपाययोजनांवर भर दिला आहे. विशेष म्हणजे, कैद्यांच्या गाठीभेटी रद्द करण्यात आल्या आहेत. नव्याने कैद्यांना प्रवेश दिला जात नसून, नव्या कैद्यांची रवानगी थेट खारघरमधील गोखले हायस्कूलमध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात करण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला या ठिकाणी २० कैद्यांना ठेवण्यात आले आहे. अत्यावश्यक वेळेला एखाद्या कैद्याला कारागृहात ठेवण्याची वेळ आल्यास त्याची कोविड १९ चाचणी करूनच कारागृहात प्रवेश दिला जाणार असल्याचे कुर्लेकर यांनी या वेळी स्पष्ट केले. तळोजा कारागृहात यापूर्वीच क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आले आहेत.
नव्या कैद्यांची रवानगी थेट विलगीकरण केंद्रात
तळोजा कारागृहात नवीन कैद्यांना प्रवेश बंद केला असून, नवीन कैदी आल्यास त्याची रवानगी खारघर शहरात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात करण्यात येत आहे. कोविडचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने कारागृह प्रशासनाने ही सावधगिरीची भूमिका घेतली आहे.
तळोजा कारागृहात सध्याच्या घडीला नवीन कैद्यांना प्रवेश बंद करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खारघर शहरात एक विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. नव्या कैद्यांना या ठिकाणी ठेवले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. - कौस्तुभ कुर्लेकर. अधीक्षक , तळोजा मध्यवर्ती कारागृह