coronavirus: उपचारांविना गरीबच नाही श्रीमंतही मरणार, रुग्णालयांतील आयसीयू फुल्ल; नवी मुंबईत रुग्णांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 01:26 AM2020-07-11T01:26:43+5:302020-07-11T06:58:48+5:30

नवी मुंबईत आयसीयू युनिटमध्ये जागाच उपलब्ध होत नसल्यामुळे उपचाराअभावी गरीबच नाही, तर श्रीमंतांनाही मरावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

coronavirus: Not only poor but also rich will die without treatment, ICU in hospitals full in Navi Mumbai | coronavirus: उपचारांविना गरीबच नाही श्रीमंतही मरणार, रुग्णालयांतील आयसीयू फुल्ल; नवी मुंबईत रुग्णांची गैरसोय

coronavirus: उपचारांविना गरीबच नाही श्रीमंतही मरणार, रुग्णालयांतील आयसीयू फुल्ल; नवी मुंबईत रुग्णांची गैरसोय

googlenewsNext

- नामदेव मोरे
नवी मुंबई : महानगरपालिकेसह खासगी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागामध्ये बेड उपलब्ध नाहीत. व्हेंटिलेटर व आॅक्सिजन युनिटची कमतरता निर्माण झाली असून, वेळेत उपचार मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. आयसीयू युनिटमध्ये जागाच उपलब्ध होत नसल्यामुळे उपचाराअभावी गरीबच नाही, तर श्रीमंतांनाही मरावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोपरी गावामधील सामाजिक कार्यकर्ते परशुराम ठाकूर यांचा  आरोग्य विभागामधील डॉक्टरांबरोबरच्या संवादाची क्लिप शहरभर व्हायरल होत आहे. ठाकूर यांच्या नातेवाइकांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तत्काळ कोविड चाचणी करण्यात आली. आयसीयूची गरज असल्याने त्यांनी अनेक रुग्णालयांत चाचपणी केली, परंतु आयसीयूमध्ये जागा उपलब्ध होत नव्हती. कोपरखैरणेतील एका रुग्णालयाने उपचारासाठी दाखल करून घेतले, परंतु कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आली, तर त्यांना इतर ठिकाणी हलवावे लागेल, असे सांगितले होते. कारण संबंधित रुग्णालयास कोविड रुग्णांवर उपचार करण्याचा परवाना नव्हता. बुधवारी दुपारी संबंधित रुग्णाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर ३२ रुग्ण प्रतीक्षा यादीवर आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तुमच्या रुग्णाचा विचार केला जाईल, तोपर्यंत त्यांना घरी घेऊन जा, असे सांगण्यात आले. पैसे भरून खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची तयारी दर्शवूनही जागा उपलब्ध झाली नाही. अखेर काही तासांनी वाशीतील एका खासगी रुग्णालयात जागा उपलब्ध झाली.  यानंतर, नवी मुंबईमध्ये गरीबच नाही, तर रुग्णालयात आयसीयू युनिट नसल्याने श्रीमंतांनाही उपचाराविना मरावे लागणार असल्याची भावना ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने संकेतस्थळावर कोरोना रुग्णांसाठी ६,८४२ बेड उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. कोविड केअर सेंटरमध्ये ४,२०१, कोविड हेल्थ सेंटरमध्ये १,७३५ व डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये ९०६ बेड असल्याचे सांगितले आहे. तीनही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये भरपूर जागा असल्याचा दावा केला आहे, परंतु प्रत्यक्षात एकाही रुग्णालयातील आयसीयू युनिटमध्ये जागा उपलब्ध होत नाही. कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांवर उपचार करण्यासाठीही मोजकीच रुग्णालये उपलब्ध असून, तेथेही आयसीयू युनिट उपलब्ध  होत नाहीत. व्हेंटिलेटरची संख्याही मर्यादित आहे. मनपाच्या वाशी रुग्णालयामध्ये अनेकांना व्हेंटिलेटरचा वापर करता येत नाही. यामुळे योग्य उपचार मिळत नसल्याने मृत्युदर वाढत आहे. मनपा प्रशासन अतिरिक्त आयसीयू युनिट, व्हेंटिलेटरची संख्या वाढविणार असल्याची घोषणा करत आहे, परंतु प्रत्यक्षात रुग्णांना वेळेत उपचारही मिळत नाहीत.

आयसीयूची एकत्रित माहिती हवी
महानगरपालिकेने त्यांच्या संकेतस्थळावर कोविड डॅशबोर्ड दिलेला आहे. त्यावर रुग्णालय व तेथे उपलब्ध बेडची संख्या दर्शविलेली आहे, परंतु आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची माहिती दिलेली नाही.
नॉन कोविड रुग्णांसाठी पालिकेची व खासगी रुग्णालयातील बेड्सची संख्या, आयसीयू विभागातील बेड्सची संख्या याविषयी तपशीलही महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही.
अशा प्रकारे तपशील उपलब्ध करून तो मनपाच्या संकेतस्थळावर नियमित देण्यास सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.

महानगरपालिकेचा दावा
6842 बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध
4201 कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध
1735 कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपलब्ध
906 डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये उपलब्ध


नवी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या संकेतस्थळावर कोरोना रुग्णांसाठी तीनही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये भरपूर जागा असल्याचा दावा केला आहे, परंतु प्रत्यक्षात एकाही रुग्णालयातील आयसीयू युनिटमध्ये जागा उपलब्ध होत नाही.

सर्वसामान्यांची धाव लोकप्रतिनिधींकडे
नवी मुंबईमधील कोरोना किंवा इतर आजार झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यासही अडथळे निर्माण होत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनाही कित्येक तास रुग्णवाहिकेची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे नाईलाजाने सर्वसामान्य नागरिकांना माजी नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याशी संपर्क करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेतले जात असल्याचे चित्र आहे.

रुग्णालयात दाखल करून घेण्यास विलंब झाला किंवा आयसीयू उपलब्ध झाला नाही, याविषयी अधिकृत तक्रार आलेली नाही. रुग्णांना योग्य उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आॅक्सिजन व व्हेंटिलेटरविषयी नागरिकांमध्येही काही गैरसमज आहेत, तेही दूर केले जातील. मनपा व खासगी रुग्णालयातील आयसीयू बेडविषयीही माहितीही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
- अण्णासाहेब मिसाळ,
आयुक्त, महानगरपालिका


नातेवाइकांना कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात वेळेत दाखल करता आले नाही, असा अत्यंत वाईट अनुभव आला असून, नवी मुंबईमध्ये गरीबच नाही, तर श्रीमंतही उपचाराशिवाय मरेल, अशी स्थिती आहे. ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर परिस्थिती अजून हाताबाहेर जाऊ शकते.
- परशुराम ठाकूर,
सामाजिक कार्यकर्ते

Web Title: coronavirus: Not only poor but also rich will die without treatment, ICU in hospitals full in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.