- नामदेव मोरेनवी मुंबई - कोरोनामुक्तीच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल सुरू झाली आहे. इंदिरानगर नागरी आरोग्य परिसर १५ दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाला असून, सलग दोन आठवडे एकही रुग्ण वाढलेला नाही. चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील रुग्ण संख्याही शून्यावर आली आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १.३९ टक्क्यांवर आली असून पॉझिटिव्हिटी रेट १.९५ टक्के आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या ब्रेक द चेन व शून्य मृत्युदर या अभियानामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश येऊ लागले आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या सर्व उपाययोजनांवर स्वत: बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली व नागरी आरोग्य केंद्रावर विश्वास ठेवून कार्यप्रणाली राबविली. यामुळे नवी मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. सुरुवातीला झोपडपट्टी परिसरात कोरोनाची झपाट्याने वाढ होऊ लागली होती. मनपा प्रशासनाने आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जनजागृती व इतर उपाययोजना सुरू केल्या. यामुळे सर्वांत प्रथम इंदिरानगर झोपडपट्टी कोरोनामुक्त करण्यात यश आले. चिंचपाडा झोपडपट्टी परिसरातील रुग्ण संख्याही शून्यावर आली आहे. चिंचपाडामध्ये आतापर्यंत ३७६ जण कोरोनामुक्त झाले असून ८ जणांचा मृत्यू झाला असून येथील कोरोनामुक्तीचे प्रमाण ९७.९२ टक्के आहे. कातकरीपाडा नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरातील रुग्णसंख्याही कमी झाली आहे. तेथे आता फक्त २ सक्रिय रुग्ण आहेत.
coronavirus: इंदिरानगरपाठोपाठ चिंचपाडाही कोरोनामुक्त, शहरवासीयांना दिलासा; सक्रिय रुग्णांची संख्या १.३९ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 12:28 AM