- वैभव गायकर पनवेल : माणूस अंथरुणावर खिळला, एखादा आजार जडला की रक्ताचे नातेही सैल होते. अशा वेळी रक्ताचे नाते नसताना, साधी ओळखही नसताना रुग्णालयात आपुलकीने चौकशी करते, औषधोपचार करते, मानसिक आधारही ‘ती’च देते. अशा शेकडो परिचारिका सध्या कोरोनाविरोधात घरदार विसरून एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढत आहेत.पनवेलसह नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात कोविडने थैमान घातले असून रुग्णांच्या सेवेत डॉक्टरांच्या बरोबरीने आरोग्य विभागातील सर्वच कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. यात परिचारिकांचीही भूमिका महत्त्वाची आहे.सध्याच्या घडीला पनवेलमध्ये उपजिल्हा रुग्णालय पनवेल व कामोठेतील एमजीएम रुग्णालयाला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आलेला आहे. पनवेल परिसरातील रुग्णसंख्येने २०० चा आकडा पार केला आहे. तर नवी मुंबईतील संख्या ७०० च्या आसपास आहे. नवी मुंबई मनपा रुग्णालयात कोविडबाधितांवर उपचार केले जात आहेत. याव्यतिरिक्त बाल माता रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्रातही परिचारिका कार्यान्वित आहेत. पनवेलमध्ये जिल्हा कोविड रुग्णालयाचा दर्जा प्राप्त असलेल्या रुग्णालयात ५० तर एमजीएम रुग्णालयात १०० च्या आसपास परिचारिका कार्यान्वित आहेत. नवी मुंबई मनपा रुग्णालयात परिचारिकांची संख्या जवळपास ६०० च्या घरात आहे. यामध्ये १५२ एएनएम परिचारिका आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कुटुंब आणि रुग्णांची सेवा अशी कसरत सध्या परिचारिकांना करावी लागत आहे. अनेक परिचारिका स्वत: कोरोनाने बाधित होत आहेत. पनवेलमधील जिल्हा कोविड रुग्णालयात कार्यान्वित असलेल्या परिचारिकांची व्यवस्था शहरातील बीपी मरिन अॅकॅडमीत केली आहे. औषधोपचारासह रुग्णांचे मनोबल वाढविण्याचे, सकारात्मकता निर्माण करण्याचे कामही या परिचारिका चोखपणे बजावत आहेत.आरोग्य सेवा देणारे कर्मचारी मानसिक तणावाखाली आहेत. आमच्या अनेक सहकाऱ्यांनाही बाधा झाली आहे. कोरोनाची लढाई नक्कीच जिंकू, असा विश्वास आहे.- मिता गावडे, परिचारिका, नवी मुंबईमहिनाभरापासून कुटुंबापासून दूर आहे. सध्या रुग्णसेवेला प्राधान्य देत आहोत. कोविडविरुद्धच्या लढाई सर्व सहकारी मनोभावे पाडणारच.- ज्योती गुरव, परिचारिका, जिल्हा कोविड रुग्णालय, पनवेल
coronavirus: परिचारिका ठरताहेत खऱ्या कोविड योद्ध्या, पनवेल, नवी मुंबईत शेकडो जणी सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 1:24 AM