नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळले असून एकूण रूग्ण संख्या 35 झाली आहे. बेलापूरमध्ये एकाचा मृत्यू झाला असून नेरूळमधील एक डाॅक्टरलाही प्रादुर्भाव झाला आहे. बेलापूर गाव येथील 54 वर्षीय नागरिकाचा 10 एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर प्राप्त झालेला कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. सदर व्यक्तीस श्वसनाचा आजार पूर्वीपासूनच होता. तशातच नेरूळ येथील कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालेले आहे.त्या अनुषंगाने बेलापूरगांव परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला असून त्या व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील 14 व्यक्तींचे कोरोना टेस्ट सॅम्पल घेण्यात आलेले आहेत.सदर 14 व्यक्तींना नवी मुंबई महानगरपालिका स्थापित इंडिया बुल्स, पनवेल येथे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन याठिकाणी ठेवण्यात आलेले असून त्यांची सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत आहे.
नेरूळ सेक्टर 8 येथील रहिवाशी असलेल्या मुंबईमध्ये कार्यरत एका डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई येथील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. कोव्हीड 19 पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार करताना त्यांस लागण झाली असावी असा प्राथमिक निष्कर्ष आहे. सदर इमारतीच्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत असून त्या सभोवतालचा परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे.