Coronavirus : खारघरच्या ग्रामविकास भवनातील कक्षात दीडशे खाटांची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 02:06 AM2020-03-16T02:06:19+5:302020-03-16T02:06:33+5:30
महापालिका क्षेत्रात विदेशवारी करून आलेल्या नागरिकांना १४ दिवस या ठिकाणी निगराणीत ठेवले जाणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पनवेल - पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून खारघर शहरातील ग्रामविकास भवनात कोरोना संशयित अथवा विदेशवारी करून आलेल्या नागरिकांसाठी विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आला असून दीडशे खाटांची सुविधा करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात विदेशवारी करून आलेल्या नागरिकांना १४ दिवस या ठिकाणी निगराणीत ठेवले जाणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पनवेलमधील नागरिक शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर येणार असल्याची माहिती पालिकेला मिळाली होती. त्यानुसार महापालिकेचे पथक रात्री अडीचच्या सुमारास विमानतळावर दाखल झाले. या वेळी पथकाने एका बसच्या साहाय्याने १६ जणांना पनवेलमध्ये आणून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यापैकी ९ जण पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. टेनिस क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी हे खेळाडू पनवेलमधून दुबईला गेले होते. उर्वरित ७ जण राज्यातील विविध भागांतील असल्याने त्यांना त्या ठिकाणी रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, पनवेल महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत.
पुढील आदेश मिळेपर्यंत सर्व शासकीय व साप्ताहिक सुट्ट्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी चारही प्रभाग अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत मॉल्स, चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यलय, खासगी शाळा, महाविद्यालये, निमशासकीय संस्था, अंगणवाड्या, बालवाड्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाºयांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही याबाबत निश्चित ठिकाणांना भेट देण्याचे आदेश आयुक्त देशमुख यांनी दिले आहेत.
उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या काही नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी अशा नागरिकांना पालिकेच्या पथकाने शोधून काढले. त्यांना खारघर येथील ग्रामविकास भवनात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांत सुमारे ३0 ते ४0 जण दुबईवरून पनवेलमध्ये दाखल झाले आहेत.