नामदेव मोरेनवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये वर्षभरामध्ये तब्बल १ लाख ४ हजार ४२२ जणांना कोरोनाची लागण झाली. यामधील ९७,२१२ जणांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागास यश आले आहे. आतापर्यंत २,०८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ५,१२४ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाची दुसरी लाट आली असून, तीन महानगरांमध्ये मार्च महिन्यातील २२ दिवसांमध्ये तब्बल ८,१२३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्यामुळे प्रादुर्भाव वाढू लागला आहे. नवी मुंबईसह पनवेलमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. कोरोनामुक्त शहर करण्यासाठी दोन्ही महानगरपालिका, उरण नगरपालिका व जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले होते. परंतु फेब्रुवारीमध्ये रेल्वे सुरू झाल्यापासून रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रतिदिन ४०० पेक्षा जास्त रुग्ण वाढू लागले आहेत. पनवेल परिसरात प्रतिदिन ३०० ते ३५० रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची साखळी खंडित करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. कोरोना टाळण्यासाठी मास्कचा वापरा करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा व वारंवार हात धुवा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. परंतु नागरिकांकडून रेल्वे, बस, भाजी मार्केट, बाजार समिती व इतर ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.
नवी मुंबई पालिकेने उपचारासाठी सुरू केलेली १२ केंद्रे बंद केली होती. फक्त वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्र सुरू ठेवण्यात आले होते. सिडको प्रदर्शन केंद्रातील रुग्णसंख्याही ३०० पर्यंत खाली आली होती. परंतु सद्य:स्थितीमध्ये तेथे ८३० रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे आता इतर केंद्रेही आवश्यकतेप्रमाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई कडक करण्यात येत आहे.
बाजार समितीमध्ये गर्दीमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला, फळ व धान्य मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. सोशल डिस्टन्सिंग नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मार्केटमधील गर्दी नियंत्रणात आणली नाही, तर बाजार समितीमध्ये व शहरामध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कागदावरच उपाययोजनामहानगरपालिकेने कोरोना रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेशही दिले आहेत. परंतु अनेक उपाययोजना फक्त कागदावरच असून प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. यामुळे रुग्णसंख्या वाढू लागली आहे.