Coronavirus: नवी मुंबईत ‘ऑपरेशन ऑल आउट’; कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 01:38 AM2021-03-27T01:38:03+5:302021-03-27T01:38:22+5:30
६०० पोलीस कर्मचारी व ७५ पालिका अधिकारी करणार कारवाई
नवी मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस व महापालिकेने संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. ‘ऑपरेशन ऑल आउट’ या मोहिमे अंतर्गत कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी न घेणाऱ्यांवर कारवाईचा होणार आहे. त्याकरिता पोलीस व पालिका अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत.
या मोहिमेसाठी ६०० पोलीस कर्मचारी व ७५ महापालिका अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांची पथके तयार करून शहरातील गर्दीच्या ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. मास्क न वापरणे, अर्धवट मास्क लावणे, सामाजिक अंतर न राखणे यांसह इतर कारणांखाली नागरिक तसेच आस्थापना चालक यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यात दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल केले जाणार आहेत. एक वर्षापासून पालिकेसह पोलिसांकडून नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
कोरोना नियंत्रणाचे आव्हान
नवी मुंबईत कोरोना नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान महापालिका व पोलीस प्रशासनापुढे आहे. त्यावर पर्याय म्हणून महापालिका व परिमंडळ १ च्या पोलिसांतर्फे ‘ऑपरेशन ऑल आउट’ हाती घेण्यात आले आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी वाशी येथे करण्यात आली.