पनवेल : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन जीव धोक्यात घालून मेहनत घेत आहे. परदेशातून आलेल्या व्यक्तींना शोधून त्यांना समजावून प्रसंगी शिव्या ऐकून त्यांना होम क्वारंटाईन किंवा सरकारी आस्थापनांमध्ये सोय करून विलगिकरण करण्यात येत आहे. मात्र, या प्रयत्नांना पनवेलमधील प्रतिष्ठित डॉक्टर दांम्पत्याने धक्का दिला आहे.
पनवेलमधील डॉ. महेश मोहिते यांची मुलगी १६ मार्चला अमेरिकेहून पनवेलला आली होती. तिला विमानतळावरच तपासणी करून १४ दिवस होम क्वारंटाईनची सूचना दिली होती. मात्र, मुलगी होम क्वारंटाईन असूनही तिच्या डॉक्टर आई वडिलांनी लहान मुलांना तपासण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महत्वाचे म्हणजे याची माहिती त्या मुलीने पालिकेलाही कळविलेली नाही. डॉ मोहिते यांनी देखील ही माहिती पालिकेपासून दडवून ठेवली. घरात होम क्वारंटाइनचा व्यक्ती असताना देखील अशाप्रकारे बाहेर वैद्यकीय सेवा देणे हे साथरोग पसरविण्याचा दृष्टीने घातक आहे. त्यामुळे आपल्या मुलीला घरात होम कोरंटाईन करून तत्काळ हॉस्पिटल बंद करण्याचे आदेश आयुक्त देशमुख यांनी दि 30 रोजी दिले आहेत.
हा धक्कादायक प्रकार समजताच पालिकेने थेट कारवाई केली असून डॉक्टर दांम्पत्याने असा मोठा अपराध केल्याचे म्हटले आहे. पनवेल पालिकेने मोहिते हॉस्पिटलला नोटीस पाठविली असून या डॉक्टर मुलीला तातडीने होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच डॉक्टर असूनही शासनापासून माहिती दडवून ठेवलेली आहे, याचा खुलासा करावा. तसेच घरामधील व्यक्ती क्वारंटाईन असल्यास वैद्यकीय सेवा देणे चुकीचे आहे. यामुळे मोहिते हॉस्पिटल बंद करावे. हॉस्पिटल सुरु ठेवण्याचा प्रयत्न केल्यास हॉस्पिटलची नोंदणीच एक वर्षासाठी रद्द करण्यात येईल असा इशारा पालिकेने दिला आहे.