Coronavirus: दुबईहून परतलेल्या ३५ जणांच्या देखभालीसाठी पनवेल महापालिका सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 07:59 PM2020-03-16T19:59:44+5:302020-03-16T20:07:38+5:30
रुग्णांची व्यवस्थित काळजी घेण्याच्या आयुक्तांच्या सूचना; देखरेखीखाली असणाऱ्यांना मोठा दिलासा
पनवेल: रायगड, पनवेल परिसरातील दुबईहून परतलेल्या 35 जणांना ग्रामविकास भवनात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या रुग्णांची राज्य शासन आणि पालिका प्रशासनाच्या विसंगतीमुळे परवड होत असल्याचे वृत्त लोकमत ऑनलाईनने दिले होते. या वृत्ताची पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. रुग्णांची व्यवस्थित काळजी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ग्रामविकास भवनात निरीक्षणाखाली असलेल्या रुग्णांना काल रात्री 11 वाजता जेवण देण्यात आले. मात्र त्यानंतर सकाळी 11.30 वाजेपर्यंत रुग्णांना नाश्ता देण्यात आला नव्हता. या नागरिकांनी ओरड केल्यानंतर त्यांना चहा आणि बिस्किटे देण्यात आली. महत्वाचे म्हणजे या नागरिकांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले खोपोलीचे वृद्ध दाम्पत्यही आहे.
रविवारी सकाळी दुबईवरून दोन विमाने मुंबईत दाखल झाली होती. यामध्ये दुबईतील शारजाहमध्ये खेळायला गेलेले क्रिकेटपटू आणि नागरिकही होते. त्यांना रायगडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, पहिल्या 16 जणांपैकी फक्त तीन जणांनाच संशयित म्हणून थांबवून घेत इतरांना सोडून देण्यात आले. यामुळे या तिघांनीही ठेवायचे तर सर्वांना ठेवा, आम्हालाच कशाला, असे म्हणत घरी जाणे पसंद केले होते. यामुळे आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली होती. अखेर आरोग्य विभागाने त्यांना पुन्हा रुग्णालयात आणले होते.
बैठकांनंतर पनवेल महापालिका प्रशासन आणि राज्याचे आरोग्य खाते यांनी खारघरच्या ग्रामविकास भवनात 14 दिवसांसाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर या सर्व 35 जणांना खारघरमध्ये हलविण्यात आले. रात्री या संशयितांना डाळ खिचडी अॅल्यूमिनिअमच्या पिशवीतून देण्यात आली होती. यासोबत चमचा किंवा प्लेट देण्यात आल्या नव्हत्या. यामुळे यातील काहींनी बाहेरून जेवणाची व्यवस्था केली. या ग्रामविकास भवनामध्ये बाथरूममध्ये पाण्याचीही सोय केलेली नसल्याचा आरोप यातील संशयित नागरिकांनी केला होता.