पनवेल : महानगरपालिका हद्दीतील कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. ३ ते १३ जुलैदरम्यान हा लॉकडाऊन आहे. तरी नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असल्याने साथ रोग अधिनियमाच्या प्राप्त अधिकारानुसार आदेशाचे पालन न केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.या कारवाईत सुमारे १ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व चारही प्रभाग समितीमध्ये हा दंड वसूल करण्यात आलेला आहे.यामध्ये मास्क न घालता फिरणे, सोशल डिस्टन्सिंग पालन न करणे, लॉकडाऊन आदेशाचा भंग करून वाहनांवर फिरणे, विहित प्रवाशांपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास करणे अशा कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत प्रभाग अ मध्ये ३२,४००, प्रभाग ब ७५००, प्रभाग क २६,८००, प्रभाग ड ६६,९०० अशी एकूण १ लाख ३३ हजार ६०० रक्कम दंडाच्या स्वरूपात वसूल करण्यात आली आहे.गुरुवारी १६५ नवे रुग्णपालिका क्षेत्रात कोविडच्या रुग्णांचा वाढता आलेख कमी होताना दिसून येत नाही. गुरुवारी पालिका क्षेत्रात १६५ नवे रुग्ण आढळले तर ९२ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. पालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या ३,३३० झाली आहे. गुरुवारी दुर्दैवी दोन रुग्णांचा कोविडने मृत्यू झाला.
coronavirus: लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर पनवेल महानगरपालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 12:37 AM