coronavirus: अर्धवट उपचार करून रुग्णाला पाठविले घरी, रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 11:40 PM2020-07-06T23:40:17+5:302020-07-06T23:40:39+5:30
लाखाच्या घरात बिल आकारूनही खासगी रुग्णालयांकडून सुरू असलेल्या हेळसांडप्रकरणी रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे.
नवी मुंबई : कोरोना झालेल्या रुग्णावर अर्धवट उपचार करून घरी पाठविल्याचा प्रकार वाशी येथे घडला आहे. दरम्यान, प्रकृती खालावल्याने रुग्णाने पुन्हा चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. लाखाच्या घरात बिल आकारूनही खासगी रुग्णालयांकडून सुरू असलेल्या हेळसांडप्रकरणी रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे.
वाशीतील फोर्टीज कोरोनावर उपचारासाठी एक व्यक्ती रुग्णालयात दाखल झाली होती. काही दिवसांनी त्यांना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगून घरी पाठविण्यात आले. दरम्यान, उपचाराचे १ लाख २५ हजार रुपयांचे बिल आकारण्यात आले, परंतु डिस्चार्ज दिल्यानंतर प्रकृतीमध्ये सुधार नसल्याने त्यांनी खासगी लॅबमध्ये पुन्हा चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यावरून केवळ बिलाची रक्कम आकारण्याची रुग्णालयात ठरावीक कालावधीसाठी दाखल करून घेतले जात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे, परंतु कोरोनाबाधित असतानाही उपचारानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगून रुग्णांना घरी पाठविले जात असल्याने कोरोनाचा संसर्ग पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. खासगी रुग्णालयामध्ये कोरोनाच्या नावाखाली अद्यापही लूट सुरूच असल्याचा प्रकार समोर येत आहेत.
मनसेचे आयुक्तांना निवेदन
सदर रुग्णाने या घटनेची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांना कळवली असता, त्यांनी रुग्णालय फोर्टीज रुग्णालय व्यवस्थापनाला धारेवर धरले, तसेच या रुग्णालयावर रुग्णासोबत केलेली हेळसांड व महामारी पसरविण्यास कारणीभूत धरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांनाही निवेदन दिले.