Coronavirus: पोलीस, होमगार्ड बंदोबस्तासाठी सज्ज; नाकाबंदीसह फिरती गस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 01:06 AM2020-07-04T01:06:05+5:302020-07-04T01:06:21+5:30

पुन्हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी कसली कंबर

Coronavirus: Police, Homeguard ready for coverage; Mobile patrol with blockade | Coronavirus: पोलीस, होमगार्ड बंदोबस्तासाठी सज्ज; नाकाबंदीसह फिरती गस्त

Coronavirus: पोलीस, होमगार्ड बंदोबस्तासाठी सज्ज; नाकाबंदीसह फिरती गस्त

googlenewsNext

नवी मुंबई : कोरोनाचा वाढत आकडा लक्षात घेऊन पालिकेतर्फे दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार, पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज झाले असून, त्यांच्या मदतीला होमगार्डच्या तुकड्या बोलवण्यात आल्या आहेत. या दरम्यान, अत्यावश्यक कारणाशिवाय फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सद्यस्थितीला ७ हजार ३४५ कोरोनाबाधित नवी मुंबईत आढळून आले आहेत. त्यापैकी २३२ जणांचा मृत्यू झाला आहे. मार्चमध्ये शहरात पहिला रुग्ण आढळून आल्यापासून एप्रिलअखेरपर्यंत शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ७० होती. मात्र, एपीएमसी व मुंबईत ये-जा करणाऱ्यांमुळे मागील दोन महिन्यांत शहरात मोठ्या संख्येने कोरोनाचा संसर्ग पसरला, पण वेळीच ठोस उपाययोजना राबवून कोरोनाचा संसर्ग पसरण्याचे टाळण्यात प्रशासनही यश मिळवू शकले नाही. परिणामी, सुरुवातीला बारा ठिकाणी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर, तिसºयाच दिवशी संपूर्ण शहरात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेणे पालिकेला भाग पडले. त्यानुसार, शुक्रवारी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू झाल्याने पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे.

लॉकडाऊनच्या अनुषंगाने शहर पोलीस व वाहतूक पोलीस यांच्या वतीने आवश्यक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. त्याशिवाय फिरती गस्ती पथके तयार केली असून, त्यांच्याकडून प्रत्येक विभागाचा बारकाईने आढावा घेतला जाणार आहे, तर पोलिसांच्या मदतीला होमगार्डच्या तुकड्या दाखल झाल्या आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान पालिकेने सूचित केल्याप्रमाणे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतीही आस्थापने सुरू राहणार नाहीत. तर शासकीय कार्यालयातही कमी मनुष्यबळ उपस्थित ठेवूनच कामकाज सुरू ठेवले जाणार आहे. खासगी ट्रॅव्हल्स, रिक्षा व टॅक्सी यांना वाहतूक करण्यावर बंदी राहणार आहे.

एमआयडीसी व एपीएमसीसह बँकांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे, तर मद्यविक्रीसाठी घरपोच सेवा देण्याची सवलत देण्यात आली आहे. १३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत हा लॉकडाऊन लागू राहणार आहे. या दरम्यान सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्ती जमल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही संकेत पोलिसांनी दिले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका व पनवेल ग्रामीण या ठिकाणी लॉकडाऊन होत आहे. त्यानुसार, या सर्वच विभागांमध्ये पुन्हा एकदा चोख बंदोबस्त आहे. हा लॉकडाऊन यशस्वी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न निघण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मागील लॉकडाऊनदरम्यान बंदोबस्तावेळी पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे यावेळी पोलिसांच्या सुरक्षेचीही पुरेपूर खबरदारी घेतली जाणार आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सुविधा व सूट देण्यात आलेल्या सुविधा वगळून इतर सर्वच आस्थापना बंद राहतील. आवश्यक ठिकाणी वाहतूक पोलीस व शहर पोलिसांतर्फे नाकाबंदी केली जाणार आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्ती जमल्यास कारवाई केली जाणार आहे. - पंकज डहाणे, उपायुक्त - परिमंडळ एक

Web Title: Coronavirus: Police, Homeguard ready for coverage; Mobile patrol with blockade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.