coronavirus: लॉकडाऊनच्या बंदोबस्ताचा ताप, पोलिसांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 12:18 AM2020-07-08T00:18:34+5:302020-07-08T00:18:59+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लावलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच, महिन्याभरात पालिकेकडून दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
नवी मुंबई : पालिकेकडून घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पोलिसांना भर पावसात बंदोबस्त करावा लागत असल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. शहरात लॉकडाऊन लावताना त्यामधून एमआयडीसी व एपीएमसी मार्केट वगळण्यात आल्याने त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्यांची वर्दळ सुरूच आहे. तर इतरही व्यावसायिकांवर पालिकेचा अंकुश नसल्याने नागरिक घराबाहेर निघत असल्याने, त्यांना आवर घालताना पोलिसांची दमछाक होऊ लागली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लावलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच, महिन्याभरात पालिकेकडून दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांना पुन्हा बंदोबस्तावर उभे राहण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, या लॉकडाऊनमधून एपीएमसी मार्केट व एमआयडीसी वगळण्यात आली आहे. यामुळे त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्यांची वर्दळ सुरूच आहे. दरम्यान, शहरात लॉकडाऊन यशस्वी कारण्यासाठीच नवी मुंबईत २२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी वाहनांची झाडाझडती घेऊन कारवाया केल्या जात आहेत. मात्र, एमआयडीसी व एपीएमसी सुरूच असल्याने, त्या ठिकाणी ये-जा करणाºयांमुळे बंदोबस्तावरील पोलिसांवर ताण वाढतच आहे. परिणामी, पोलिसांकडून सरसकट कारवाया केल्या जात आहेत. यामध्ये अनेकांची वाहनेही जप्त करण्यात आली आहेत, तर काहींवर गुन्हेही दाखल करण्यात येत आहेत. मात्र, पालिकेच्या आदेशाला न जुमानता, अनेक विभागांमध्ये अर्धे शटर उघडे ठेवून व्यवसाय चालविले जात आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचे नियोजन फासल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग-व्यवसाय बंद ठेवले जाण्याची गरज होती, असेही तज्ज्ञांचे मत आहे, परंतु तसे न करता एपीएमसी व एमआयडीसी सुरूच ठेवल्याने नागरिकांना घराबाहेर निघण्याची संधी मिळत असल्याने लॉकडाऊन अपयशी ठरत असल्याचीही टीका होत आहे. या फसलेल्या लॉकडाऊनचा ताप मात्र पोलिसांना सहन करावा लागत आहे.
पावसात उभे राहून बजावत आहेत कर्तव्य
एकीकडे पालिकेने नागरिकांना घराबाहेर निघण्यास दिलेली छुपी सूट व पोलिसांना सरसकट कारवाईचे वरिष्ठांकडून मिळालेले आदेश, यामध्ये नागरिक भरडले जात आहेत. पावसात उभे राहून रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने अडवून त्यांच्याकडे चौकशी करावी लागत आहे.
अनोळखी व्यक्तींशी संपर्क येत असल्याने त्यांनाही कोरोनाची भीती सतावत आहे. कोरोनापासून बचाव झाला, तरी साथीच्या आजाराचे अथवा सततच्या बंदोबस्तामुळे इतर दुखणी वाढण्याची भीती आहे. कामानिमित्ताने ये-जा करणाºयांची संख्या आटोक्यात येत नसल्यानेही पोलिसांची दमछाक झाली आहे.