Coronavirus: पीपीई किट्स, मास्कचा कचरा रस्त्यावर; नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 01:21 AM2020-06-28T01:21:40+5:302020-06-28T01:21:56+5:30
कचऱ्याची विल्हेवाट लावण्याविषयी जनजागृतीच नाही
नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणारे पीपीई किट्स, मास्क व हातमोजे रस्त्यावरच टाकले जात आहेत. यामुळे शहरात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढण्याची भीती आहे.
सायन-पनवेल महामार्गावर बेलापूर खिंडीत रस्त्यावरच पीपीई किट्स फेकण्यात आल्या आहेत. महामार्गावरील हा जैविक कचरा काही दिवसांपासून या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांनी पीपीई किट वापरणे आवश्यक आहे, परंतु डॉक्टरांशिवाय समाजसेवक व अत्यावश्यक सेवेतील इतर कर्मचारीही याचा वापर करत आहेत. रुग्णालयातील पीपीई किट्सची बायोमेडिकल वेस्टच्या यंत्रणेमार्फत विल्हेवाट लावली जात आहे, परंतु अनेक खासगी डॉक्टर व या किट्सचा वापर करणारे जागा मिळेल, तेथे फेकून देत आहेत. अशाच प्रकारे बेलापूर खिंडीमध्ये कचरा टाकण्यात आला आहे. या किट्सचा वापर कोरोना रुग्णाला घेऊन जाण्यासाठी केला असेल, तर त्यावरील विषाणूंमुळे या परिसरात प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
पीपीई किट्सप्रमाणेच मास्कही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फेकले जात आहेत. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये मागील तीन महिन्यांमध्ये आठ लाखांपेक्षा जास्त मास्कची विक्री झाली आहे. १११ प्रभागांमध्ये स्थानिक नगरसेवक व इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही मोफत मास्कचे वाटप केले आहे. नागरिकांनीही मेडिकलमधून मोठ्या प्रमाणात मास्कची खरेदी केली आहे. वापरलेले मास्क सोसायटीमधील कचराकुंडीत व रोडवरही फेकून दिले जात आहेत. शहरात अनेक ठिकाणी फेकलेल्या मास्कचा कचरा दिसू लागला आहे. याशिवाय हातमोजेही कुठेही फेकून दिले जात आहेत. वास्तविक, महानगरपालिकेने व शासनाने मास्कचा वापर करा, असे सांगितले. मास्कची विल्हेवाट योग्य प्रकारे करावी, असे आवाहनही केले आहे, परंतु नक्की मास्क कुठे टाकावा, याविषयी माहिती दिलेली नाही. खराब झालेले मास्क संकलित करण्याचीही काहीच यंत्रणा उभी केलेली नाही.
तीन दिवस विषाणूचा धोका
फेकलेल्या मास्क, हातमोजे व पीपीई किट्सवर तीन दिवस कोरोना व इतर विषाणू राहू शकतात, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. रोडवरील मास्क भिकारी गोळा करून घेऊन जात असल्याचेही पाहावयास मिळते. त्यांनी ते वापरले तर त्यांनाही कोरोना होण्याची भीती आहे. घरातील सोसायटीत मास्क टाकल्यामुळे कचरा वाहतूक करणाºयांनाही लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महानगरपालिकेची उदासीनता : महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व मुख्य आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांच्याशी पीपीई किट व मास्कची विल्हेवाट कशी लावायची, याविषयी माहिती घेण्यासाठी संपर्क साधला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. महानगरपालिकेने आतापर्यंत याविषयी कोणतीही जनजागृती केली नसल्याची माहितीही मनपा अधिकाºयांकडून समजली. मनपाच्या या उदासीनतेमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
शिरवणेमध्येही सापडल्या होत्या पीपीई किट्स
यापूर्वी २५ एप्रिलला शिरवणे परिसरात कचराकुंडीत पीपीई किट्स टाकल्याचे आढळले होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पीपीई किट्स टाकणाºयांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, परंतु प्रत्यक्षात पुढे काहीही कारवाई झालेली नाही.