नवी मुंबई : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने, खासगी डॉक्टर काळजीत पडले आहेत. शासकीय डॉक्टरांप्रमाणेच खासगी डॉक्टरांनाही विम्याचे संरक्षण मिळावे, अशी मागणी डॉक्टरांच्या विविध संघटनांकडून होत आहे, परंतु शासन अद्यापही निर्णायक भूमिकेवर पोहोचत नसल्याने, डॉक्टरांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.कोविड योद्धा म्हणून प्रशासनाच्या सूचनेप्रमाणेच जर खासगी डॉक्टर सेवा देत असतील, तर शासकीय डॉक्टरांप्रमाणेच त्यांनाही विम्याचे संरक्षण का मिळू नये, असा प्रश्न आहे. त्याकरिता होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (हिम्पाम) सातत्याने प्रयत्नशील असल्याचे, संघटनेचे राज्य सहसचिव डॉ. प्रतीक तांबे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनाही संघटनेच्या वतीने या संदर्भात निवेदने दिली आहेत. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) यासह इतर अनेक संघटनांनीही राज्यभरातील खासगी डॉक्टरांना विमा कवच मिळण्याची मागणी केली आहे.राज्यात कोरोनाचा शिरकाव होऊन चार महिने उलटूनही खासगी डॉक्टरांच्या बाबतीत शासन उदासीन असल्याची खंत हिम्पामचे सहसचिव डॉ. तांबे यांनी व्यक्त केली आहे. शासनाला स्मरणपत्र देऊन दखल घेतली जात नसल्याने, डॉक्टरांना जीव मुठीत धरून रुग्णसेवा द्यावी लागत आहे. परिणामी, खासगी डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचीही चर्चा खासगी डॉक्टरांमध्ये आहे.कोरोनाबाधितांचा आकडा वाढताचवाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे शहर हादरले आहे. कोरोना चाचणीत रोज १५०हून अधिक नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. अशातच पावसाळा सुरू झाल्याने साथीच्या आजाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान, साध्या थंडीतापाचा रुग्ण हाताळतानाही डॉक्टरांना पुरेशी खबरदारी घ्यावी लागणार आहे, तर गतमहिन्यात तुर्भे येथे दवाखाना चालवणाऱ्या एका डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. इतरही काही डॉक्टर वेळीच औषधोपचार करून कोरोनातून बचावले आहेत.
coronavirus: खासगी डॉक्टरांचा जीव टांगणीला, शासनाच्या उदासीनतेमुळे आंदोलनाच्या पवित्र्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 1:23 AM