Coronavirus: कामोठ्यात खळबळ! पॉझिटिव्ह वृद्धाच्या मुलाचा प्रताप; क्वारन्टाईन असून खुलेआम फिरला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 06:59 PM2020-03-21T18:59:44+5:302020-03-21T19:05:25+5:30
Coronavirus: वृद्धाचे नमुने मुंबईस्थित कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तेथे ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला आढळला होता. १ मार्चला दुबईवरून आलेल्या ६२ वर्षीय वृद्धाला कोरोना झाल्याचे समजल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांचा मुलगा होम क्वारंटाईन करूनही खुलेआम फिरताना सापडला आहे.
वृद्धाचे नमुने मुंबईस्थित कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तेथे ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पहिला रुग्ण पनवेल परिसरात सापडल्याने नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण असताना आता त्यांच्या मुलाने प्रताप केले आहेत.
वडिलांना कोरोनाच्या विषाणूची बाधा झाली असताना सर्रास कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता होम क्वारन्टाईच्या सूचना पाळल्या नसल्याचे शनिवारी आयुक्त गणेश देशमुख, प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ नागनाथ यमपल्ले, तहसीलदार अमित सानप यांच्या आढावा दौऱ्यात उघड झाले. देशभरात कोरोनाच्या संसर्गामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असताना हलगर्जीपणा केल्याने यासंदर्भात प्रभाग अधिकारी सुरेश गांगरे यांच्या तक्रारीनुसार हि फिर्याद नोंदविण्यात आली आहे.यासंदर्भात भादवी कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा प्रकार महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलेला नसून रत्नागिरी, नागपूरमध्येही असे प्रकार घडलेले आहेत. गायिका कनिका कपूरनेही असाच प्रकार करत मोठमोठ्या हायप्रोफाईल पार्ट्यांना हजेरी लावली होती. यामध्ये केंद्रीय मंत्री, उत्तर प्रदेशचे मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि उद्योजकही होते. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.