Coronavirus रायगडच्या संशयितांची परवड; 11.30 वाजले तरीही चहा, नाश्ता दिला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 12:43 PM2020-03-16T12:43:16+5:302020-03-16T12:50:53+5:30
बैठकांनंतर पनवेल महापालिका प्रशासन आणि राज्याचे आरोग्य खाते यांनी खारघरच्या ग्रामविकास भवनात 14 दिवसांसाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पनवेल : रायगड, पनवेल परिसरातील दुबईहून परतलेल्या 35 जणांना ग्रामविकास भवनात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या रुग्णांची राज्य शासन आणि पालिका प्रशासनाच्या विसंगतीमुळे परवड होत असून रात्री 11 वाजता दिलेल्या जेवणानंतर सकाळी 11.30 वाजेपर्यंत नाश्ता देण्यात आला नव्हता. या नागरिकांनी ओरड मारल्यानंतर त्यांना चहा आणि बिस्किटे देण्यात आली. महत्वाचे म्हणजे या नागरिकांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले खोपोलीचे वृद्ध दांम्पत्यही आहे.
रविवारी सकाळी दुबईवरून दोन विमाने मुंबईत दाखल झाली होती. यामध्ये दुबईतील शारजाहमध्ये खेळायला गेलेले क्रिकेटपटू आणि नागरिकही होते. त्यांना रायगडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, पहिल्या 16 जणांपैकी फक्त तीन जणांनाच संशयित म्हणून थांबवून घेत इतरांना सोडून देण्यात आले होते. यामुळे या तिघांनीही ठेवायचे तर सर्वांना ठेवा, आम्हालाच कशाला, असे म्हणत घरी जाणे पसंद केले होते. यामुळे आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली होती. अखेर आरोग्य विभागाने त्यांना पुन्हा रुग्णालयात आणले होते.
बैठकांनंतर पनवेल महापालिका प्रशासन आणि राज्याचे आरोग्य खाते यांनी खारघरच्या ग्रामविकास भवनात 14 दिवसांसाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर या सर्व 35 जणांना खारघरमध्ये हलविण्यात आले. रात्री या संशयितांना डाळ खिचडी अॅल्यूमिनिअमच्या पिशवीतून देण्यात आली होती. यासोबत चमचा किंवा प्लेट देण्यात आल्या नव्हत्या. यामुळे यातील काहींनी बाहेरून जेवणाची व्यवस्था केली. या ग्रामविकास भवनामध्ये बाथरूममध्ये पाण्याचीही सोय केलेली नसल्याचा आरोप यातील संशयित नागरिकांनी केला आहे. तसेच या संशयितांमध्ये 8 दिवसांपूर्वी दुबईहून भारतात आलेल्या तरुणालाही रविवारी घरातून विलगीकरण केंद्रात आणण्यात आले आहे.
उशिराने आलेला नाष्टा दरवाजातून परत पाठवला
खारघरच्या विलगीकरण केंद्रामध्ये ठेवलेल्या संशयितांना आज सकाळी 11 वाजले तरीही चहा, नाश्ता देण्यात आला नव्हता. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गोंधळ घातला. अखेर 11.30 च्या सुमारास पोलिसांनी त्यांना बिस्किटे आणि चहा दिला. हा नाष्टा संशयितांनी परत पाठविला. तर वृद्ध दांम्पत्याला बाहेरून जेवण देण्याची सोय करण्यास त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले.
यावर महापालिका प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला असून सर्वांच्या नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता कंत्राटदार नेमला असल्याचे उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.
कोरोनाला रोखण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन लागले कामाला