CoronaVirus News: पनवेलमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; मृत्युदरही घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:57 PM2020-08-12T23:57:25+5:302020-08-12T23:57:37+5:30

महापालिकेच्या सकारात्मक प्रयत्नांना यश

CoronaVirus recovery rate of corona patients increased in Panvel | CoronaVirus News: पनवेलमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; मृत्युदरही घटला

CoronaVirus News: पनवेलमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; मृत्युदरही घटला

Next

- वैभव गायकर 

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविड रुग्णांचा वाढता आकडा सर्वांसाठी चिंतेची बाब बनला आहे. असे असले, तरी या रुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण सुमारे ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ही बाब पालिकेच्या अहवालातून स्पष्ट झाल्याने पनवेलकारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, कोविडने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांची केंद्र सरकारची टक्केवारी ३.९ टक्के आहे, तर राज्याची टक्केवारी ३.७ आहे. त्या तुलनेत पनवेल पालिका क्षेत्रात हा मृत्युदर २.४ टक्के असल्याचे दिसून आले आहे.

पालिका क्षेत्रात ८,२२७ रुग्ण आहेत. यापैकी ६,६१९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला केवळ १,६११ बाधित रुग्ण आहेत. कामोठे शहरात कोरोनाचे सर्वाधिक १,७७५ रुग्ण आहेत, तर तळोजामध्ये सर्वात कमी म्हणजेच ५०० रुग्ण आहेत. आजवर पालिका क्षेत्रात १९७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पनवेल शहरात २६ सध्या रुग्ण आहेत, तर सर्वाधिक ४०१ रुग्ण कळंबोलीमध्ये आहेत. पालिकेने कोविडच्या टेस्टिंग वाढविल्याने कोविडच्या रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळत आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये अँटिजेन टेस्टमुळे तत्काळ कोविड डिटेक्ट होत आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग कोविडच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. खासगी डॉक्टरांनाही कोविडच्या रुग्णांवर घरोघरी जाऊन उपचार करण्याची परवानगी दिल्याचे महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले. जास्तीतजास्त कोविड रुग्णांना उपचार मिळावे, याकरिता खासगी कोविड रुग्णालयांची संख्याही ११ वरून १४ केली असल्याचे देशमुख यांनी सांगितले. पालिकेच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय पनवेल, कामोठे येथील एमजीएम रुग्णालय आदी ठिकाणी कोविडच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाधितांना लवकरात लवकर उपचार मिळत आहे. डॉक्टरांना घरोघरी जाऊन कोविड रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. विशेष म्हणजे पालिका क्षेत्रातील मृत्युदर नियंत्रणात आहे.
- सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

देवांशी इन, इंडिया बुल्स, रोडपाली येथील पोलीस मुख्यालय आदी ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहेत. खासगी रुग्णालयात उपचारासाठी प्रत्येक रुग्णालयात शिल्लक खाटांची माहिती जाहीर करण्याची मागणी मनसे, तसेच नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली होती. त्यानुसार, दररोज पालिका क्षेत्रातील उपलब्ध खाटांची माहिती जाहीर केली जाते

Web Title: CoronaVirus recovery rate of corona patients increased in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.