नवी मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. बेड उपलब्ध व्हावा, यासाठी नातेवाईक मनपाच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत आहेत. महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवरील माहितीही अपूर्ण असल्यामुळे नागरिकांच्या गोंधळामध्ये भर पडत आहे. नवी मुंबईमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या सहा हजारपेक्षा जास्त असून, उपचारासाठी उपलब्ध बेडची संख्या ३८९७ एवढी आहे. मनपा प्रशासनाने डॅशबोर्डवर दिलेल्या माहितीप्रमाणे रुग्णालयांमध्ये २५४३ जण उपचार घेत असून, १३५४ बेड शिल्लक आहेत. आयसीयू, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन व जनरल बेडची संख्या पुरेशी असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. रुग्णालयात संपर्क केल्यानंतर बेड उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात येत आहे. यामुळे नातेवाईकांचा गोंधळ वाढू लागला आहे. बेड मिळविण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींना संपर्क करावा लागत आहे. दिवसभर धावपळ केल्यानंतर बेड उपलब्ध होऊ लागला आहे. शहरातील प्रमुख खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. यामुळे उपचारासाठी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. महानगरपालिकेच्या डॅशबोर्डप्रमाणे २५५३ जण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित जवळपास साडेतीन हजार नागरिकांवर घरीच उपचार सुरू आहेत. अशीच स्थिती राहिली, तर पुढील आठवड्यात उपचार वेळेत न मिळणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
coronavirus: बेड मिळविण्यासाठी नातेवाइकांची धडपड, अधिकारी, लोकप्रतिनिधींना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 3:21 AM