नवी मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. कोरोनाच्या संसर्गाच्या संभाव्य ठिकाणांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. मात्र, शहरात धावणाऱ्या शेअर आॅटोमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे काही दिवस शेअर आॅटोवर निर्बंध घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, जिम, विरंगुळा केंद्रे, उद्याने आदी बंद ठेवण्यात आली आहेत. एकूणच गर्दीच्या ठिकाणे टाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, गर्दी वाढल्यास लोकल सेवा बंद करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी काही प्रमाणात सार्वजनिक परिवहनच्या बसेस आणि लोकलच्या प्रवासाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सर्वच परिवहनच्या बसेस रिकाम्या धावताना दिसत आहेत. मात्र, शहरांतर्गत प्रवासासाठी सोयीच्या ठरणाºया आॅटो रिक्षांचा धंदा तेजीत आल्याचे दिसून आले आहे. शहरात काही मार्गावर शेअर आॅटो धावतात. यातून एका वेळी तीन ते चार प्रवासी नेले जातात. विशेषत: रेल्वेस्थानकापासून विविध नागरी वसाहतींपर्यंत जाण्यासाठी आरटीओच्या संमतीने शेअर्स आॅटोचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये अशाप्रकारे शेअर्स आॅटोचे अनेक मार्ग आहेत. गर्दी टाळण्यासाठी प्रवासी सध्या आॅटोला प्राधान्य देत आहेत. पैसे वाचविण्यासाठी शेअर आॅटो सोयीचे ठरत असल्याने रिक्षाचालक एका वेळी चारपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, हे रिक्षाचालक कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी हे रिक्षाचालक कोणत्याही प्रतिबंधात्मक साधनांचा वापर करीत असल्याचे दिसत नाही. मास्क लावणे गरजेचे असतानाही अनेक रिक्षाचालकांना त्याचे वावडे असल्याचे पाहावयास मिळते. अशा परिस्थितीत एखादा कोरोनाबाधित प्रवासी रिक्षात बसल्यास दाटीवाटीने बसलेल्या अन्य प्रवाशांना त्याचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील काही दिवस शहरातील शेअर आॅटोचे मार्ग बंद करावेत, अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.
Coronavirus : शेअर ऑटोमुळे संसर्गाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 3:25 AM