नामदेव मोरे
नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा वेग मंदावला आहे. रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांसाठी बेडची संख्याही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. सद्यस्थितीमध्ये ६,०७३ बेडची उपलब्धता असून, त्यामधील २,४२० बेडचा प्रत्यक्षात वापर सुरू असून, ३,६५३ बेड शिल्लक आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेने कोराेनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ब्रेक द चेन मोहीम राबविली असून, त्याला यश येऊ लागले आहे. रुग्णांना बेडची कमतरता भासू नये, यासाठी मनपाने स्वत:ची भव्य कोरोना केअर सेंटर उभी केली असून, खासगी रुग्णालयांचाही आधार घेतला आहे. सद्यस्थितीमध्ये पुरेसे बेड उपलब्ध होऊ लागले आहेत. मागील एका आठवड्यापासून सातत्याने रुग्णांची संख्या कमी होत असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचले आहे.
उत्सव काळात घ्यावी लागणार काळजी
दसरा व दिवाळी जवळ आली आहे. सद्यस्थितीमध्ये कोरोना वाढीचा वेग मंदावला असून, त्यामध्ये सातत्य राखण्याचे आव्हान आहे. दसरा व दिवाळीमध्ये शहरवासीयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. महानगरपालिका प्रशासनानेही उत्सव काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांमध्ये जागृती सुरू केली असून, खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.
कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिका सदैव दक्ष असून, विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. सद्यस्थितीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. उत्सव काळात प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. सद्यस्थितीमध्ये पुरेसे बेड उपलब्ध आहेत. -अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका