coronavirus: कुटुंब व्यवस्थेत ‘कहीं खुशी, कहीं गम’; अनेकांना भविष्याची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 03:00 AM2020-05-15T03:00:12+5:302020-05-15T03:00:12+5:30
नवी मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. नोकरी-व्यवसायासाठी हे शहर सोयीचे असल्याने येथे विविध प्रांतातील लोक वास्तव्यास आहेत. भाषा, प्रांत वेगवेगळे असले तरी सर्वांची कुटुंब रचना सारखीच आहे.
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : लॉकडाउनमुळे जगण्याचे परिमाण बदलले आहेत. आई, बाबा, मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य दोन महिन्यांपासून घरात बंद आहेत. लॉकडाउन ही संधी समजून काही जण कुटुंबातील सैल झालेल्या नात्यांची वीण घट्ट करण्यात मग्न आहेत. तर काही जण परस्परांतील हरवलेला संवाद पुन:स्थापित करण्याच्या प्रयत्नात आहेत; परंतु काही कुटुंबात अस्वस्थता आहे. सर्वच जण घरात बंद असल्याने उत्पनाचे मार्ग ठप्प झाले आहेत. उदरनिर्वाहाचा प्रश्न, भविष्याची चिंता सतावते आहे. परिणामी, कुटुंबात कलह वाढले आहेत. एकूणच कुटुंब संस्थेत ‘कही खुशी, कही गम’ असेच काहीसे वातावरण अनुभवयास मिळत आहे.
नवी मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. नोकरी-व्यवसायासाठी हे शहर सोयीचे असल्याने येथे विविध प्रांतातील लोक वास्तव्यास आहेत. भाषा, प्रांत वेगवेगळे असले तरी सर्वांची कुटुंब रचना सारखीच आहे. त्यामुळे लॉकडाउनमुळे निर्माण झालेले प्रश्न कमी-अधिक प्रमाणात सारखेच आहेत. नोकरी-व्यवसाय सोडून कुटुंबातील सर्व सदस्यांना अनपेक्षितपणे एकत्र राहवे लागत आहे. सुरुवातीचे काही दिवस बरे वाटले. सुट्टी समजून एकत्रित धम्माल केली. परस्परात संवाद वाढला आहे. दुरावलेली नाती जवळ येत आहेत. मात्र, त्यानंतर काय? लॉकडाउन वाढतच असल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्य अस्वस्थ आहे. अनेकांना नैराश्य आले आहे. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते हे परिणाम कुटुंबनिहाय वेगवेगळे आहेत.
कुटुंबाची आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक अशा तीन प्रकारात वर्गवारी करण्यात येते. अभ्यासकांच्या मते, या तिन्ही प्रकारच्या कुटुंबावर लॉकडाउनचे विभिन्न परिणाम दिसून येत आहेत. हातावर पोट असलेल्या कुटुंबाच्या व्यथा वेगळ्या आहेत. घरात राहणे त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे सहाजिकच कलह निर्माण होत आहेत. आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी असलेल्या आणि शैक्षणिक दर्जा उत्तम असलेल्या कुटुंबासाठी लॉकडाउन संधी वाटते आहे. टीव्ही, मोबाइल, गेमिंग, व्हॉटसअॅप, टिष्ट्वटर, फेसबुक आदीसह मनोरंजनाची विपुल साधने उपलब्ध असल्याने अशा कुटुंबात मौजमस्तीचे वातावरण पाहावयास मिळते; परंतु मानवी मनाचा विचार करता ही प्रक्रियाही मर्यादित स्वरूपाची त्यामुळे कधी लॉकडाउन संपते, अशी नैराश्यपूर्ण प्रतिक्रिया त्यांच्यातून उमटत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबाचेही फारसे वेगळे नाही. आठ-पंधरा दिवस ठीक आहेत; परंतु दीड-दोन महिन्यांच्या कोंडीने कुटुंब संस्थेच्या मूल्यांनाच हादरे बसताना दिसत आहेत.
एकमेकांची काळजी घेण्याची प्रवृत्ती वाढली
लॉकडाउनमुळे दारू, सिगारेट आणि तंबाखूचे व्यसन सुटले, ही बाब समाधानाची असली तरी त्यामुळे अनेक कुटुंबात हिंसाचार वाढला आहे.
तर काही कुटुंबात दुरावलेली नाती जवळ आली आहेत. परस्पराची काळजी घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. संवादातील अडथळे दूर झाले आहेत.
एरवी किचनकडे न फिरकणारी पुरुष
मंडळी वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करून कुटुंबीयांना खाऊ घालत आहेत.