CoronaVirus : पोलिसांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी; वयस्कर व आजारी कर्मचाऱ्यांना बंदोबस्त नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 07:06 PM2020-04-29T19:06:56+5:302020-04-29T20:55:19+5:30
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागला आहे. तर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा देखील संपेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवरील ताण अधिकच वाढू शकतो.
नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे मागील दीड महिना बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्याशिवाय त्यांच्याही कुटुंबीयांना अन्न धान्याची चणचण भासणार नाही याचीही खबरदारी घेतली जात आहे. यादरम्यान ५० वर्षे वयाच्या व प्रकृती ठिक नसलेल्यांना देखील तणावापासून लांब ठेवले जात आहे.
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागला आहे. तर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा देखील संपेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवरील ताण अधिकच वाढू शकतो. अशावेळी त्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य ठिक राहावे, यासाठी पोलीस आयुक्तालय मार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्याकरिता सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना घरची चिंता लागू नये याकरिता ४ हजार कर्मचाऱ्यांना अन्न धान्य उपलब्ध करून दिले आहे. त्याशिवाय बंदोबस्ताचा ठिकाणी सावलीसाठी शेड व सॅनिटायझर पुरविले आहेत. सध्या आयुक्तालय क्षेत्रात ९ चेकपोस्ट लावण्यात आल्या असून त्या सर्व ठिकाणी मंडप घातले आहेत. त्याठिकाणी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना अन्न पाण्याचीही सोय केली आहे.
पोलीस संजय कुमार, सह आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्यासह सर्व उपायुक्तांकडून कोरोनापासून पोलिसांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. बॅचरल राहणाऱ्या ४५० कर्मचाऱ्यांची दोन वेळच जेवण दिले जात आहे. तर वयाने ५० वर्षापेक्षा जास्त असलेल्यांना व प्रकृतीची कारणे असलेल्यांना तणावाच्या ठिकाणच्या बंदोबस्तामधून वगळण्यात आले आहे. शिवाय कर्तव्य बजावत असताना सुरक्षेसाठी ६२६४ हॅन्डग्लोज, २५०० हेडशिल्ड व ६०० गॉगल पुरवण्यात आलेत. प्रत्येक पोलिसठाण्यात पाच पीपीई किट देण्यात आले आहेत. शिवाय ४९०० अधिकारी व कर्मचारी यांना एन ९५ मास्कचे व कुटुंबियांना तीन लेयरच्या सुमारे ३८ हजार मास्कचे वाटप केले आहे.
आरोग्याच्या दृष्टीने सर्वांची वैद्यकीय चाचणी केली असता डॉक्टरांनी ७४ जनाची कोरोना चाचणी करण्याचे सुचवले होते. त्यापैकी ३२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ४२ जणांचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. दरम्यान पोलिसांचे स्वास्थ्य ठीक राहावे यासाठी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी औषधें देण्यात आली आहेत.