Coronavirus: कोरोना नियंत्रणासाठी तारेवरची कसरत; चाचणीसाठीचा विलंब ठरतोय जीवघेणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 11:39 PM2020-06-29T23:39:29+5:302020-06-29T23:39:48+5:30
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. १३ मार्चला शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला.
नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी पहिला लॉकडाऊन सुरू होऊन १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीमध्ये नवी मुंबईमधील रुग्णसंख्या तब्बल ६,४२७ झाली आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी तारेवरची कसरत करत, ५७ टक्के रुग्ण बरे करण्यात यश मिळविले आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १,२०० बेडचे विशेष रुग्णालय उभारण्यात आले आहे. रुग्णांचा आलेख वाढत असतानाही मुंबई व नवी मुंबईमधील नागरिकांना धान्यपुरवठा करणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती सुरळीत सुरू ठेवण्यात यश मिळविले आहे.
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. १३ मार्चला शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. फिलिपाइन्सवरून वाशीमध्ये कार्यक्रमास आलेल्या विदेशी नागरिकास सर्वप्रथम कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. पहिल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सुरुवातीला रुग्णवाढीचे प्रमाण नियंत्रणात होते, परंतु मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी गेलेले बेस्ट वाहक, डॉक्टर, नर्स, बँक कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली व त्यांच्यामुळे ते वास्तव्य करत असलेल्या परिसरात रूग्णांचे प्रमाण वाढू लागले. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यापारी, कामगार व वाहतूकदारांमुळेही वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व तुर्भे परिसरात कोरोनाची झपाट्याने वाढ झाली. एपीएमसी व मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्यामुळे सुरुवातीला ६० टक्के रुग्ण वाढले. नवी मुंबईमधील परिस्थितीही हाताबाहेर जाऊ लागली. सद्यस्थितीमध्ये शहरात ६,४२७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत २०७ जणांचा मृत्यू झाला असून, ३,६३२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. २,५८८ जणांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी चारस्तरीय रचना तयार केली आहे. २३ नागरी आरोग्य केंद्रे व बेलापूर, नेरुळ व ऐरोली रुग्णालयात फ्लू क्लिनिक सुरू केली आहेत. १९ ठिकाणी कोविड केअर सेंटर, ११ ठिकाणी कोविड हेल्थ सेंटर व १० ठिकाणी डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू केली. वाशी प्रदर्शन केंद्रामध्ये विशेष रुग्णालय सुरू केले.
धान्यपुरवठा सुरळीत ठेवण्यात यश
- मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीला ‘मुंबईचे धान्य कोठार’ असे संबोधले जाते. मुंबई, नवी मुंबई परिसरातील दीड कोटी नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा येथून होत असतो.
- कोरोनामुळे व्यापारी व कामगारांनीही मार्केट बंदचा निर्णय घेतला होता, परंतु शासन व प्रशासनाने एपीएमसीमध्ये विशेष आरोग्य शिबिर राबविले.
- सर्र्वांना विश्वासात घेऊन मार्केट सुरू करण्यात यश मिळविले. यामुळे सुरुवातीला सुरू झालेला अन्नधान्याचा तुटवडा व कृत्रिम दरवाढ कमी करण्यात यश मिळविले. धान्यपुरवठा सुरळीत राहिल्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली.
चाचणीसाठीचा विलंब ठरतोय जीवघेणा
नवी मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७ टक्के आहे. काही वेळेत हे प्रमाण ६० टक्क्यांवर जात आहे. मृत्यूचा दर ३ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अजून वाढू शकते. सद्यस्थितीमध्ये कोरोना चाचणीचा अहवाल वेळेत येत नाही. ५ ते १५ दिवस विलंब लागल्यामुळे वेळेत उपचार करता येत नाहीत. चाचणीचा अहवाल २४ तासांत मिळाला, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढविणे शक्य होणार आहे. यामुळे शासन व प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेने विशेष मास स्क्रीनिंग मोहीम सुरू केली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरात आतापर्यंत ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी केली आहे. शिबिरामध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांची स्वॅब टेस्ट केली जात आहे.