अनंत पाटील
नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १० ठिकाणी ४४ कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. त्यामुळे बेलापूर ते दिघा परिसरातील ९० टक्के केश कर्तनालय दुकाने पहिल्या दिवशी बंद होती. केवळ १० टक्केच दुकाने सुरू असल्यामुळे पहिल्या दिवसाचा अनुभव म्हणजे ‘कही खुशी कही गम’ असा आल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले.
नवी मुंबईत बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या आठ विभागांत एकूण ३,५०० केश कर्तनालये आहेत. त्यापैकी २०० केश कर्तनालय सुरू होती. उघड्या असलेल्या सलूनमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या सूचनांचे पालन करीत पीपीई किट, सॅनिटायझर, वन टाइम युज गाऊन आदींचा वापर केला. लॉकडाऊनमुळे सलून कारागीर त्यांच्या मूळगावी गेल्यामुळे सरकारने सलून सुरू करण्याची परवानगी देऊनही कारागीर मिळत नसल्यामुळे व्यवसाय धोक्यात आला आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्याचे नाभिक विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेश गायकर यांनी केला आहे. चार महिन्यांपासून बंद असलेल्या सलून व्यावसायिकांना भरपाई म्हणून आर्थिक मदत करावी, अशी मागणी घणसोली नाभिक समाज संघटनेचे सल्लागार सुभाष गायकर यांनी केली आहे. महापालिका किंवा संबंधित विभागाकडून सुरक्षितेच्या दृष्टीने बैठक बोलावून चर्चा करणे आवश्यक होते, असे घणसोली नाभिक सेवा संघटनेचे अध्यक्ष रोहिदास गायकर यांनी सांगितले.