नवी मुंबई : आई-वडिलांसह कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या १३ वर्षीय मुलाने रुग्णालयात उपचारादरम्यान आठवीची आॅनलाइन परीक्षा दिली. त्यासाठी त्याला नवी मुंबईतील नेरूळ येथील एका रुग्णालयाने सर्वोपरी मदत केली.नेरूळ येथील तेरणा स्पेशालिटी या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे येथे राहणाऱ्या नीलेश कदम, पत्नी निशी आणि मुलगा निरंजन (१३) यांना कोरोना पॉझिटिव्ह म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेरा वर्षीय मुलगा निरंजन कोपरखैरणे येथील एका खाजगी शाळेत आठवीत (सीबीएसई) शिकत असून नेमकी त्याची आॅनलाइन परीक्षा याच वेळी होती. रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे आपण ही परीक्षा देऊ शकणार नाही या कल्पनेने तो थोडासा नाराज होता. त्याने ही खंत तेरणा रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे बोलून दाखविली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्याने निरंजनला आॅनलाइन परीक्षा देण्यासाठी रुग्णालय सर्वतोपरी मदत करेल, असे त्यांच्या पालकांना सांगण्यात आले.नवी मुंबई महानगरपालिकेने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून निरंजनसाठी वॉर्डमध्ये परीक्षेसाठी टेबल-खुर्ची तसेच वायफाय इंटरनेट व लॅपटॉप देण्यात आला. निरंजननेही कोरोनाला न घाबरता सलग चार दिवस परीक्षा दिली. त्याला या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.कोरोना संक्रमणामुळे अनेकांना मानसिक तणाव येतो व चिडचिड होते; परंतु ेनिरंजनने कोरोनाला न घाबरता रुग्णालयात उपचारादरम्यान राहून परीक्षा दिली ही घटना कोरोना काळात नक्कीच सकारात्मक आहे. निरंजन हा आता पूर्णपणे बरा होऊन आपल्या घरी गेला आहे. कोरोनाचे संकट संपल्यानंतर आम्ही त्याचा खास सत्कार करणार असल्याची माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे उप महाव्यवस्थापक संतोष साइल यांनी दिली.नेरूळच्या तेरणा रुग्णालय प्रशासनाने माझ्या मुलाचे शैक्षणिक वर्षे वाया जाणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी घेऊन त्याला रुग्णालयातून आॅनलाइन परीक्षा देण्यासाठी सर्वोपरी मदत केल्यामुळे तो आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही.- नीलेश कदम,निरंजनचे वडील
coronavirus: कोरोनाग्रस्त असताना विद्यार्थ्याने रुग्णालयातून दिली ऑनलाइन परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 12:18 AM