CoronaVirus : कोरोना नियंत्रणाच्या तुर्भे पॅटर्नला यश, रुग्णवाढीवर मिळविले नियंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 11:54 PM2020-06-26T23:54:12+5:302020-06-26T23:55:27+5:30
नागरी आरोग्य केंद्र, विभाग कार्यालय व पोलिसांसह लोकप्रतिनिधी व नागरिकांनी एकत्रित टीमवर्क करून कोरोना नियंत्रणाचा तुर्भे पॅटर्न तयार केला आहे.
नामदेव मोरे
नवी मुंबई : तुर्भे स्टोअर व अल्प उत्पन्न गटाच्या वसाहती कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरल्या होत्या. सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या या परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात प्रशासनास यश आले आहे. नागरी आरोग्य केंद्र, विभाग कार्यालय व पोलिसांसह लोकप्रतिनिधी व नागरिकांनी एकत्रित टीमवर्क करून कोरोना नियंत्रणाचा तुर्भे पॅटर्न तयार केला आहे.
नवी मुंबईमधील सर्वात गंभीर परिस्थिती असलेल्या परिसरामध्ये तुर्भे विभागाचाही समावेश आहे. अहिल्याबाई होळकर नागरी आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र असलेल्या तुर्भे स्टोअर झोपडपट्टी, तुर्भे सेक्टर २१, २२, १८ व २४ परिसरामध्ये २२ एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. या परिसरामध्ये आतापर्यंत ४५७ रुग्ण सापडले असून, १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येथील रुग्णसंख्या सातत्याने वाढू लागली होती. एप्रिल महिन्यात ७ रुग्ण, तर मे महिन्यात तब्बल २६८ रुग्ण आढळून आले व जून महिन्यात आतापर्यंत १८२ रुग्ण आढळून आले आहेत. २४ मे रोजी सर्वाधिक २९ रुग्ण वाढले होते. महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड, विभाग अधिकारी समीर जाधव व एपीएमसीसह तुर्भे पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे ११ जूननंतर सातत्याने रुग्णांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.
कोरोनाच्या भीतीने तुर्भे परिसरातील खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद केले होते. त्यांची झूम अॅपवर बैठक घेऊन सर्व दवाखाने उघडण्यास प्रोत्साहन देण्यात आले. रॅपिड अॅक्शन टीम तयार करून, रुग्ण सापडलेल्या परिसरातील १०० घरांमधील प्रत्येकाचे सर्वेक्षण केले. रुग्णांच्या संपर्कातील सर्वांची कोरोना चाचणी केली. रुग्ण सापडलेल्या परिसरात बॅरिकेट्स लावण्यात आले. परिसराचे, रुग्ण सापडलेल्या घरांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले. झोपडपट्टी परिसरामध्येही मास्क व सॅनेटायझरचे महत्त्व पटवून दिले. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन वैद्यकीय आरोग्य अधिकाºयांनी वसाहतीमध्ये जाऊन नागरिकांचे प्रबोधन करून, सर्वांना घरामध्ये थांबणे आवश्यक असल्याचे पटवून दिले. या सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊन कोरोनाचे प्रमाण नियंत्रणात आले असून, हा पॅटर्न शहरात सर्वत्र राबविल्यास नवी मुंबई कोरोनामुक्त करणे शक्य होणार आहे.
>व्यापक जनजागृती
विनाकारण घराबाहेर पडणे, मास्कचा वापर न करणे व इतर नियमांचे उल्लंघन केले जात असल्यामुळे तुर्भे परिसरामध्ये रुग्णसंख्या वाढत होती. वैद्यकीय अधिकाºयांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन तुर्भे स्टोअर परिसरामध्ये जनजागृती केली.
मास्क वापरणे, घरात थांबण्याचे महत्त्व समजावून सांगितले. सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे व सॅनेटायझर वापरणे आवश्यक असल्याचे समजून सांगितले.
पोलिसांनीही गस्त वाढविली. मनपाने नियम तोडणाºयांवर कारवाई सुरू केली. रॅपिड रिस्पाँस टीमने प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण केले. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तिंचीही तपासणी केली. या सर्व उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे.
>तुर्भे परिसरातील कोरोना रुग्णांचा तपशील
कालावधी रुग्ण
२२ ते २५ एप्रिल १
२६ ते ३० एप्रिल ६
१ ते ५ मे ३
६ ते १० मे ३०
११ ते १५ मे ४२
१६ ते २० मे ६३
२१ ते २५ मे ६५
२६ ते ३१ मे ६५
१ ते ५ जून ५६
६ ते १० जून ६३
११ ते १५ जून ३७
१६ ते २० जून २०
२१ ते २६ जून ६
>महानगरपालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे परिसरामध्ये कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. रुग्ण सापडलेल्या परिसरातील १०० घरांमध्ये रॅपिड रिस्पाँस टीमच्या मदतीने सर्व्हे करण्यात आला. विभाग कार्यालयाच्या वतीने सॅनेटायझर, मास्क न घालणाºयांवर कारवाई व इतर उपाययोजना केल्या. पोलिसांनीही पेट्रोलिंग वाढविल्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाºयांवर नियंत्रण ठेवता आले. लोकप्रतिनिधींसह सर्वांनी एकत्रित येऊन काम केल्याने रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात आणता आले.
- कैलास गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, अहिल्याबाई होळकर नागरी आरोग्य केंद्र
>तुर्भे स्टोअर व तुर्भे परिसरामध्ये मास्क न घालणाºयांकडून दोन लाखांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. रुग्ण सापडलेल्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले. नागरी आरोग्य केंद्र व सर्वांना विश्वासात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात आल्या. सर्व विभागांनी टीमवर्कप्रमाणे काम केले.
- समीर जाधव, विभाग अधिकारी तुर्भे