CoronaVirus News: नवी मुंबईत लहान मुलांचे मृत्यू रोखण्यात यश; दहा वर्षांपर्यंत एकच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:46 AM2020-10-08T00:46:16+5:302020-10-08T00:46:24+5:30

तीनशेपेक्षा जास्त कोरोनाबाधित महिलांची सुरक्षित प्रसूती; मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट

CoronaVirus Success in preventing child deaths in Navi Mumbai | CoronaVirus News: नवी मुंबईत लहान मुलांचे मृत्यू रोखण्यात यश; दहा वर्षांपर्यंत एकच मृत्यू

CoronaVirus News: नवी मुंबईत लहान मुलांचे मृत्यू रोखण्यात यश; दहा वर्षांपर्यंत एकच मृत्यू

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : महानगरपालिकेने मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. लहान मुलांचे मृत्यू रोखण्यातही यश मिळविले असून, दहा वर्षांपर्यंत वयोगटांतील फक्त एकच मुलाचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मनपाच्या रुग्णालयात जवळपास साडेतीनशे कोरोनाबाधित महिलांची सुरक्षितपणे प्रसूती करण्यात आली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने ‘ब्रेक द चेन’ मोहीम प्रभावीपणे राबविली आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णांचे प्रमाण वाढले तरी चालेल, परंतु मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जुलैमध्ये तीन टक्केपेक्षा जास्त मृत्युदर होता. सद्यस्थितीमध्ये मृत्युदर दोन टक्क्यांवर आणण्यात यश मिळविले आहे. प्रत्येक रुग्ण कोरोनामुक्त करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. शहरात लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. प्रतिदिन दहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या १० ते १५ जणांना कोरोची लागण होत आहे. मंगळवारपर्यंत या वगोगटात १,७६८ जणांना प्रादुर्भाव झाला आहे. यापैकी फक्त एकाचाच मृत्यू झाला आहे. ११ ते २० या वयोगटांतील २,९०५ जणांना लागण झाली असून, त्यापैकी ५ जणांचाच मृत्यू झाला आहे. लहान मुले व तरुणांमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९० टक्के पेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोरोना झालेल्या गरोदर महिलांची गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात विशेष कक्ष सुरू केला आहे. डॉ.राजेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पाच डॉक्टरांचे पथक यासाठी कार्यरत आहे. आतापर्यंत ३५०पेक्षा जास्त महिलांची प्रसूती महापालिकेच्या रुग्णालयात झाली आहे. महिला व अर्भकाला नवीन जीवनदान देण्यात आले आहे. आतापर्यंत दोन महिलांचा मृत्यू झाला असून, त्याही प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर मनपाच्या केंद्रात आल्या होत्या.

३,५९५ ज्येष्ठांची कोरोनावर मात : ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे, परंतु नवी मुंबईमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ४,७९० जणांना आतापर्यंत कोरोना झाला असून, त्यापैकी ३,५९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीमध्ये ६८५ ज्येष्ठ नागरिक रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मृत्युदर कमी करण्यावर महानगरपालिकेने विशेष लक्ष दिले आहे. सद्यस्थितीमध्ये मृत्युदर २ टक्क्यांवर आला आहे. कोरोना झालेल्या गरोदर महिलांनाही योग्य उपचार मिळवून देण्यात येत आहेत.
- अभिजीत बांगर, आयुक्त,
नवी मुंबई महानगरपालिका

९० टक्के तरुण कोरोनामुक्त
नवी मुंबईत तरुणांमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही जास्त आहे. ४० वर्षे वयोगटापर्यंतचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. ११ ते २० वयोगटांत कोरोनामुक्त होण्याचे सर्वाधिक ९२.३५ टक्के प्रमाण आहे.

वयोगटाप्रमाणे कोरोनाबळींची संख्या
वयोगट मृत्यू
० ते १० १
११ ते २० ५
२१ ते ३० १७
३१ ते ४० ४७
४१ ते ५० ९३
५१ ते ६० २१५
६१ ते ७० २२०
७१ ते ८० १३५
८१ ते ९० ५३
९१ ते १०० २

Web Title: CoronaVirus Success in preventing child deaths in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.