सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी पालिकेच्या वतीने सोमवारपासून दहा ठिकाणी विशेष लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यानुसार, अत्यावश्यक सुविधा वगळता, सर्व दुकाने बंद ठेवून दहाही ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे, तर मंगळवारपासून इतर दोन ठिकाणीही लॉकडाऊन लावला जाणार आहे.
नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या सहा हजारांच्या वर गेली आहे. अवघ्या दोन महिन्यांत २०५ जणांचा कोरोनामुळे बळीही गेला आहे. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे; परंतु काही ठिकाणी उपाययोजनांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा दहा ठिकाणांना पालिकेने विशेष प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. त्या ठिकाणी सोमवारपासून लॉकडाऊनचे आदेश लागू आहेत. त्यामध्ये दिवाळे गाव, करावे गाव, तुर्भे स्टोअर, तुर्भे सेक्टर २१, तुर्भे गाव, जुहूगाव, खैरणे बोनकोडे, कोपरखैरणे सेक्टर १९, राबाडे गाव व चिंचपाडा या विभागांचा समावेश आहे. या दहाही परिसरात प्रवेशाचे सर्व मार्ग बंदिस्त केले आहेत. ५ जुलैपर्यंत येथे लॉकडाऊन पाळला जाणार आहे. या दरम्यान या विभागात पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्रत्येक नागरिकाची चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे नजरेआड असलेले संशयित रुग्ण समोर येतील व त्यांच्यावर उपचार करून कोरोनाची साखळी तोडता येईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे. मंगळवारपासून वाशी गाव आणि सीबीडी सेक्टर १ ते ९ या ठिकाणीही लॉकडाऊन लागू होणार आहे. विशेष लॉकडाऊन लागू केलेल्या क्षेत्रांपैकी तुर्भे स्टोअर व कोपरखैरणे सेक्टर १९ हा परिसर इतर कंटेन्मेंट झोनपेक्षा अति संवेदनशील समजला जात आहे.चोख पोलीस बंदोबस्त : दहाही ठिकाणचे रस्ते रहदारीसाठी बंद केल्यानंतर, त्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्या ठिकाणावरून वाहने अथवा नागरिकांना प्रवेशास बंदी आहे. लॉकडाऊन लागू केलेल्या क्षेत्रात दवाखाने, दूधविक्री व औषधांची दुकाने या व्यतिरिक सर्व व्यवसाय बंद केले आहेत. अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे, तर परिसरात पोलिसांकडून गस्तही घातली जात आहे. लॉकडाऊनच्या अनुषंगाने परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनीही सर्व विभागांना भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. एखाद्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे आवाहन पोलिसांनी केले आहे.कोरोनामुक्तीसाठी तुर्भे पॅटर्नतुर्भे परिसरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत होती. त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रत्येक पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील किमान २५ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची चाचणी करण्यात आली. संशयितांना वेळीच उपचार मिळाल्याने, मागील १० दिवसांत येथे नवा रुग्ण आढळलेला नाही.लॉकडाऊन लावण्यात आलेल्या क्षेत्रात चाचणीदरम्यान संशयित रुग्ण आढळ्यास, त्यांना तत्काळ स्वॅब टेस्टिंगसाठी पाठवून विलगीकरण केले जाणार आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. - अण्णासाहेब मिसाळ, पालिका आयुक्त, नवी मुंबई