- नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून वाशीतील मनपाच्या शवागृहात मृतदेहांची संख्या वाढू लागली आहे. शहरात कोरोनामुळे २७८ जणांचा मृत्यू झाला असून इतर अजारांमुळेही अनेकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व मृतदेहांची देखभाल करण्याचे काम तीन कर्मचारी करीत आहेत. कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारीही याच कर्मचाऱ्यांवर आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून तीन महिने अविश्रांतपणे सेवा करणारे हे त्रिमूर्ती खºया अर्थाने देवदूत ठरले आहेत.महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयातील शवागृहात काम करणाºया या आरोग्यदूतांमध्ये सुनील वाघेला, राजू कवळे व जगदीश पाटील यांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या काही रुग्णांना परिवारातील सदस्यांसह गृहनिर्माण सोसायटीतील रहिवासी व परिचितांकडून योग्य वागणूक मिळत नाही. अनेकांना अप्रत्यक्षपणे सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाची लागण होईल या भीतीने अनेक डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद केले आहेत. खाजगी रुग्णवाहिकांनी त्यांची सेवाही बंद केल्याचे अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे. परंतु दुसरीकडे महापालिकेच्या शवागृहामध्ये स्वत:च्या जीवाची पर्वा न करता तीन कर्मचारी तीन महिने अविरतपणे काम करीत आहेत. आतापर्यंत तब्बल २७८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामधील काहींना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्यांचा मृतदेह रुग्णालयातच सुरक्षितपणे प्लास्टीकमध्ये गुंडाळला जातो. परंतु कोरोनाचे निदान होण्यापूर्वी ज्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृतदेह संशयित म्हणून शवागृहात ठेवला जातो व कोरोनाचा अहवाल आल्यानंतर शवागृहातील कर्मचारीच तो प्लास्टीकमध्ये गुुंडाळतात. या मृतदेहांवर आरोग्य विभागाच्या नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार केले जातात. शवागृहातून स्मशानभूमीमध्ये घेऊन जाण्याची जबाबदारीही या तीन कर्मचाऱ्यांवर आहे. मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन जाण्यापासून दहनशेडमध्ये ठेवण्यापर्यंत सर्व कामे करावी लागत आहेत. तीन महिने अनेकवेळा साप्ताहिक सुट्टीही न घेता हे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मृतदेह शवागृहात ठेवण्यापासून अंत्यसंस्कारापर्यंत सर्व सोपस्कार करीत आहेत. कर्तव्यभावनेतून सेवा करणाºया या कर्मचाºयांचे शहरवासीयांकडूनही कौतुक होऊ लागले आहे. काँगे्रसचे पदाधिकारी अनिकेत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्या निवडुंगे व सिद्धेश पाटणे यांनी शवागृह आवारात जाऊन या तिघांचाही गौरव केला आहे.कर्तव्यभावनेतून सेवा : कोरोनाग्रस्त मृतदेह हाताळणाºया व त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणाºया सुनील वाघेला, राजू कवळे व जगदीश पाटील यांच्याविषयी सर्वांनाच आदर वाटत आहे. शवागृहात काम करताना भीती वाटत नाही का? असे विचारल्यानंतर यापैकी एक सदस्याने सांगितले, १० ते १५ वर्षे आम्ही याच विभागात काम करीत आहोत. मृतदेह हाताळताना योग्य काळजी घेतली की घाबरण्याचे काहीही कारण नाही. आम्ही योग्य खबरदारी घेत आहोत आणि आतापर्यंत तरी सुरक्षित आहोत. कर्तव्यभावनेतून ही सेवा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.कसे असते कामशवागृहात काम करणाºया या तीन कर्मचाºयांना कोरोना झालेले मृतदेह व्यवस्थित ठेवणे. संशयास्पदरीत्या मृत्यू झालेले मृतदेह व्यवस्थित ठेवणे. एखाद्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला की तो मृतदेह नियमाप्रमाणे प्लास्टीकच्या आवरणात गुंडाळणे. मृतदेहांवर नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार करणे. त्यासाठी शवागृहातून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह घेऊन जाण्याचे काम हे कर्मचारी करीत आहेत. हे काम करीत असताना अनेक चांगले-वाईट अनुभव त्यांना येत आहेत.
coronavirus: मृतदेहांची तीन महिने देखभाल, शवागृहातील त्रिमूर्ती ठरले देवदूत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 12:56 AM