coronavirus: कामगारांच्या लोंढ्यांमुळे कसारा घाटात वाहतूककोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 02:11 AM2020-05-11T02:11:31+5:302020-05-11T03:13:30+5:30
दोन दिवसांपासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशकडे जाणारी वाहने, मजुरांमुळे कसारा घाटात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. नाशिकहून रेल्वे, बसची सोय केली आहे, तुम्ही घरे रिकामी करा, अशी अफवा काही मंडळींनी पसरवली.
- श्याम धुमाळ
कसारा : लॉकडाउननंतर राज्यातील मजूर, कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने अनेकांनी पायी गावाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशकडे जाणारी वाहने, मजुरांमुळे कसारा घाटात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. नाशिकहून रेल्वे, बसची सोय केली आहे, तुम्ही घरे रिकामी करा, अशी अफवा काही मंडळींनी पसरवली. याला बळी किंवा विश्वास ठेवत मिळेल त्या वाहनाने ही मंडळी नाशिक गाठण्याचा प्रयत्न करत आहेत; पण या लोंढ्यांना कसारा येथील लतिफवाडी, इगतपुरी चेक पोस्ट येथे अडवले जात आहेत. नाशिकहून गाड्या सोडल्या जात आहेत, आम्हाला सोडा, अशी विनवणी हे परप्रांतीय मजूर पोलिसांना करत होते. कामगारांचा हा टाहो पाहून यंत्रणांचे मनही व्यथीत होत आहे.
परराज्यातील मजुरांनी काळजी करू नये त्यांची व्यवस्था केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगूनही हे मजूर, कामगार आपल्या मूळगावी जाण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत. नाशिकहून गाड्या सुटत आहेत, अशी कुणीतरी अफवा पसरवल्याने त्यांना आशेचा किरण दिसू लागला. त्यामुळे ही मंडळी टेम्पो, ट्रक, सायकल रिक्षा प्रसंगी पायी नाशिक गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे रविवारी कसारा घाटात वाहतूककोंडी झाली होती. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, परप्रांतीय मजुरांपाठोपाठ आता नांदेड, परभणी, संभाजीनगर, उस्मानाबाद, नागपूरसह अन्य भागात जाणारे मजूर, कामगारांचे लोंढेही बाहेर पडले असून त्यापैकी अनेकांना घरमालकांनी घराबाहेर काढल्याने त्यांच्यापुढे गावाला जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. हे कामगार कुटुंबांसह गावाला जात असून त्यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीमतर्फे श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या साईधाम ट्रस्ट (करंज पाडा) येथे दुपारी, व रात्रीच्या वेळी निवासाची सोय केली जात आहे.
जर केंद्राने काही दिवस दररोज रेल्वेसेवा सुरू केली असती तर आज आम्ही आमच्या गावी सुखरूप पोहोचलो असतो.
- मनीषकुमार, कामगार.
कोरोनामुळे मोठी आपत्ती ओढवली असून राज्य, केंद्र सरकारही साथ आटोक्यात आणण्यासाठी चांगल्या
पद्धतीने प्रयत्न करीत आहेत. आम्हाला आमच्या राज्यात जाण्यासाठी सरकारने
आता आम्हाला थोडी मदत करावी. जेणेकरून आम्ही आमच्या गावाला कुटुंबाकडे पोहोचू.
- शिवकुमार दुबे, कामगार.
परप्रांतीयांची ठाण्यासह कल्याणकडे पायपीट
नवी मुंबई : लॉकडाउनमुळे शहरात अडकून पडलेले परप्रांतीय पायी ठाणेसह कल्याणकडे धाव घेऊ लागले आहेत. त्या ठिकाणावरून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या रेल्वे सुटत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी पायपीट सुरू केली आहे.
परराज्यातील व्यक्तींना मूळगावी जाण्याला शासनाकडून सवलत मिळाली आहे; परंतु रेल्वेवर अवलंबून असलेल्या बहुतांश परप्रांतीयांना अद्याप प्रवासाचा पास मिळालेला नाही. अशा व्यक्तींकडून जिथून रेल्वे सुटत आहेत, अशा ठिकाणांकडे धाव घेतली जात आहे. त्यामध्ये ठाणे, कल्याण तसेच पनवेल स्थानकाचा समावेश आहे.
या स्थानकातून काही करून रेल्वे पकडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याच उद्देशाने मुंबईच्या अनेक भागातील परप्रांतीय नवी मुंबईत प्रवेश करत असून रेल्वे रुळावरून अथवा रस्त्याने पायी प्रवासाचा टप्पा गाठत आहेत. तर ठाणे व कल्याणच्या दिशेने जाण्यासाठीदेखील नवी मुंबईतील मार्गांचा वापर होत आहे. अशाच प्रवासादरम्यान तुर्भे स्थानकाच्या आवारात विश्रांतीसाठी थांबणाऱ्यांचे घोळके जमत आहेत.
खासगी वाहनाने गाव गाठण्याची ऐपत नसल्याने ते रेल्वेवर अवलंबून आहेत; परंतु त्यांच्या प्रवासाचा मार्ग खुलत नसल्याने कोणत्याही परिस्थितीत जिथून रेल्वे सुटतात तिथून त्या पकडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यादरम्यान नवी मुंबईत नाकाबंदीच्या ठिकाणी त्यांना अडवले जात आहे. त्यानंतरही दुसºया मार्गाचा वापर करून इच्छित रेल्वेस्थानक गाठण्यासाठी त्यांची पायपीट सुरूच आहे.