coronavirus: बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींवर लक्ष केंद्रित, नवी मुंबईमध्ये सर्वत्र तुर्भे पॅटर्नची अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 12:08 AM2020-07-10T00:08:45+5:302020-07-10T00:09:05+5:30
रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तपासण्यांची संख्या वाढविली असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीतजास्त व्यक्तींचा तत्परतेने शोध घेऊन त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्याची पद्धत प्रभावीपणे राबविली जात आहे.
नवी मुंबई - कोरोना नियंत्रणासाठीच्या तुर्भे पॅटर्नची शहरभर अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. सद्य:स्थितीमध्ये रुग्णाच्या संपर्कातील सरासरी २८ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर आवश्यकतेप्रमाणे उपचार किंवा क्वारंटाइन केले जात आहे.
रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तपासण्यांची संख्या वाढविली असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीतजास्त व्यक्तींचा तत्परतेने शोध घेऊन त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्याची पद्धत प्रभावीपणे राबविली जात आहे. केंद्र सरकारच्या यादीत नवी मुंबईतील तुर्भे स्टोअर्स हा भाग रेड झोन म्हणून प्रदर्शित झाल्यानंतर या भागाकडे विशेष लक्ष देण्यात आले. येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील जास्तीतजास्त व्यक्ती शोधून त्यांची आरोग्य तपासणी व त्यांच्यामध्ये लक्षणे दिसत असल्यास विलगीकरण व उपचार ही पद्धत प्रभावी रीतीने राबविण्यात आली. यामध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील २४ व्यक्तींचा शोध घेतला गेला. यामुळे या भागातील कोरोनाबाधितांच्या वाढीवर १५ दिवसांत पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले. कोरोना मुक्तीची ही पद्धत ‘तुर्भे पॅटर्न’ म्हणून नावाजली गेली.
ही पद्धत शहरभर लागू करण्याच्या सूचना २३ नागरी आरोग्य केंद्रांना देण्यात आल्या होत्या. याविषयी नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या उपक्रमास प्रतिसाद मिळाला असून कोरोना रुग्णाच्या संपर्कातील २८ व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले आहे. संपर्कातील व्यक्तीमध्ये लक्षणे दिसल्यास तत्काळ स्वॅब टेस्ट करून क्वारंटाइन केले जात आहे.
महापालिका क्षेत्रात मास स्क्रीनिंग मोहीम
३ जुलैला मध्यरात्रीपासून संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात
१० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यापूर्वी २९ जूनपासून ज्या भागात १५ दिवस आधी मोठ्या संख्येने कोरोनाबाधित सापडले होते अशा
१२ विशेष प्रतिबंधित क्षेत्रांत सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.
त्या १२ क्षेत्रांत घरोघरी जाऊन मास स्क्रीनिंग मोहीम राबविण्यात आली व
एक लाखाहून अधिक नागरिकांची कोविडविषयक आरोग्य तपासणी करण्यात आली. यामधील संशयितांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून त्यांचे विलगीकरणदेखील करण्यात येत आहे. ही मास स्क्रीनिंग मोहीम यापुढील काळात नवी मुंबई पालिका क्षेत्रातील कोरोनाबधित मोठ्या संख्येने आढळत असलेल्या इतर भागांतही राबविण्यात येणार आहे.