नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये दोन दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा कोरोनाचे दोन नवीन रुग्ण सापडले आहेत. कोपरखैरणेमधील रुग्णाच्या परिवारातील दोघांना लागण झाली आहे. शहरातील रुग्णांची संख्या 30 झाली असून आतापर्यंत पाच जण बरे झाले आहेत. कोपरखैरणे सेक्टर 19 मधील एक व्यक्तीस गत आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील सात जणांचे अहवाल तपासणीसाठी दिले होते. यापैकी पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, पुतण्या व पुतणीला कोरोना झाला आहे. नवी मुंबईमध्ये दोन दिवस एकही रूग्ण वाढला नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु बुधवारी रुग्ण वाढल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवी मुंबईमधील आतापर्यंत 180 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 125 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 25 जणांचे अहवाल यायचे आहेत. महानगरपालिकेच्या केंद्रात 8 व 1102 जणांचे होम क्वारंटाईन सुरू आहे. तब्बल 633 जणांनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. मनपाच्या आयसोलेशन वाॅर्डमध्ये 25 जण उपचार घेत असून, नवी मुंबईचे चार व पनवेलच्या दोन कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
टाळ्या वाजवून केले स्वागत
सीवूडमधील 72 वर्षांच्या वृद्धास गत आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. सोसायटीमधील नागरिकांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. घणसोलीमधील कोरोना बाधीत महिलेची प्रसूती मनपा रुग्णालयात झाली होती. त्या मुलीचे अहवाल ही निगेटिव्ह आले आहेत.