coronavirus: एपीएमसीत उपाययोजनांवर पाणी , मार्केटबाहेर अनधिकृत व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 02:53 AM2020-05-15T02:53:30+5:302020-05-15T02:54:21+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, घणसोली व नेरुळ परिसरात मार्केटमुळे प्रादुर्भाव वाढला आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद केली आहे; परंतु मार्केटबाहेर रस्त्यावर अनधिकृतपणे व्यापार सुरू झाला आहे. नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या व्यवसायामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. तसे न झाल्यास एपीएमसीत प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांवर पाणी फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, घणसोली व नेरुळ परिसरात मार्केटमुळे प्रादुर्भाव वाढला आहे. व्यापारी, माथाडी कामगार, एपीएमसी कर्मचारी, वाहतूकदारांनाही लागण झाली आहे. यामुळे शासनाने ११ ते १७ मे दरम्यान एपीएमसी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक मार्केटची साफसफाई व निर्जंतुकीकरण सुरू केले आहे. मार्केटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष उपाययोजना सुरू असताना मार्केटच्या बाहेर रस्त्यावर अनधिकृत व्यापार जोमाने सुरू झाला आहे.
कांदा-बटाटा मार्केटच्या बाहेर अन्नपूर्णा चौक ते अरेंजा सर्कलजवळील पेट्रोल पंपापर्यंत कांदा, बटाटाचे टेम्पो उभे केले जात आहेत. खरेदीसाठी ग्राहकही गर्दी करू लागले आहेत. अनेक विक्रेते व ग्राहक मास्कचा वापर करत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होताना दिसत नाही. यामुळे पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एपीएमसीच्या गेटबाहेरील भाजी व फळ विक्रेत्यांना लागण झाली आहे. यामुळे तुर्भे विभाग अधिकारी व पोलिसांनी फळविक्रेत्यांवर कारवाई केली होती. त्यामुळे काही दिवस अनधिकृत व्यवसाय थांबला होता. मात्र, आता मार्केट बंद असल्याने कांदा, बटाटासह फळांचाही अनधिकृत व्यापार सुरू झाला आहे.
स्मशानभूमी ते एनएमएमटी डेपोकडील रस्त्यापर्यंत फळांचे टेम्पो उभे केले जात असून तेथेच व्यापार केला जात आहे. एपीएमसीच्या बाहेरील व्यापारावर कारवाई करण्याचा अधिकार एपीएमसी प्रशासनास नाही. यामुळे नवी मुंबई महापालिका व पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कारवाई केली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेरील रस्त्यावर अनधिकृतपणे व्यापार करणाऱ्यांवर नियमित कारवाई केली जात आहे. कारवाईनंतरही व्यापार सुरू असेल तर पुन्हा कारवाई केली जाईल.
- दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, परिमंडळ-१
सर्व उपाययोजनांवर पाणी : कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी महापालिका व एपीएमसी प्रशासन प्रयत्न करत आहेत. पाचही मार्केटमधील १०० टक्के व्यवहार बंद केले आहेत. आरोग्य शिबिर सुरू आहे. औषध फवारणी सुरू आहे; परंतु दुसरीकडे मार्केटच्या गेटबाहेरील अनागोंदी कारभार सुरू आहे. रस्त्यावरील अतिक्रमण थांबविले नाही तर कोरोना रोखण्यासाठीच्या सर्व उपाययोजनांवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.