Coronavirus Updates: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा नवी मुंबईतल्या तरुणाईला फटका; २० ते ४० वयोगटातील सर्वाधिक रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 01:24 AM2021-03-26T01:24:28+5:302021-03-26T01:24:42+5:30
ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यूचा धोका कायम
नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोनाची दुसरी लाट नवी मुंबईकरांसाठी धोकादायक ठरू लागली आहे. २४ दिवसांमध्ये ५,५९६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यामध्ये २० ते ४० वयोगटातील २,४५४ जणांचा समावेश आहे. या महिन्यात १४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्यामध्ये ११ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
पालिकेचा निष्काळजीपणा व नियम तोडणाऱ्या नागरिकांमुळे नवी मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बुधवारी वर्षभरातील सर्वांत जास्त ५१९ रुग्णांची नोंद झाली आहे. पालिकेला बंद केलेली उपचार केंद्रे पुन्हा सुरू करावी लागली आहेत. दुसरी लाट खूप धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे.
एक महिन्यात ५,५९६ रुग्ण वाढले असून, त्यामध्ये तरुणांचा सर्वाधिक समावेश आहे. २० ते ३० वयोगटातील १,१४७ व ३० ते ४० वयोगटातील १,३०७ नवीन रुग्ण वाढले आहेत. नोकरी - व्यवसायासाठी तरुणांना घराबाहेर पडावे लागत आहे. यामुळे तरुणांना धोका वाढत आहे. तरुणाईमध्ये नियम पाळण्याविषयी उदासीनता निदर्शनास येऊ लागली आहे. आम्हाला काही होणार नाही, असे मत अनेक जण व्यक्त करीत असून, मास्कचा वापर करण्याचे टाळत आहेत. हात धुणे व गर्दीच्या ठिकाणी न जाण्याच्या नियमांचेही पालन केले जात नाही. यामुळे तरुणाईभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे.
लहान मुलांनाही लागण होत आहे. १० वर्षे वयोगटातील १६४ जणांना लागण झाली आहे. ११ ते २० वयोगटातील ४३८ जणांना लागण झाली आहे. लहान मुलांना घरातील सदस्यांमुळे व बाहेर खेळण्यासाठी गेल्याने लागण होत आहे. महिन्यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. एका महिन्यात १ ते ३० वयोगटातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ३० ते ५० वयोगटातील ३ जणांचा मृत्यू झाला असून, ११ जणांत ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. सहव्याधी असणाऱ्यांत मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. तरुणांनी दक्ष राहावे व ज्येष्ठांचीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.