योगेश पिंगळेनवी मुंबई : शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना काही त्रास होत नसल्यास गृहविलगीकरणाचा पर्याय दिला जात आहे. मात्र अनेक ठिकाणी गृहविलगीकरणातील अनेक पॉझिटिव्ह व्यक्ती विविध कारणांसाठी बेजबाबदारपणे सार्वजनिक ठिकाणी फिरून इतरांना कोरोनाचे वाटप करत असल्याचे समोर आले आहे. नागरिकांच्या या बेजबाबदारपणामुळे शहरात बाधितांची संख्या वाढत आहे.
नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून, लसीकरणालाही वेग आला आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापालिकेकडून वारंवार केले जात असताना मात्र अनेक नागरिक याकडे दुर्लक्ष करून नियमांचे उल्लंघन करत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने विशेष पथकांची निर्मिती केली असून, शहरातील सर्वच विभागात कारवायांचे सत्र सुरू करण्यात आले आहे.
दररोज रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने ज्या पॉझिटिव्ह रुग्णांना काही त्रास होत नसल्यास तसेच घरामध्ये स्वतंत्र विलगीकरणाची जागा असल्यास त्यांचे गृहविलगीकरण केले जात आहे. गृहविलगीकरण केलेले अनेकजण विविध कारणांसाठी घराबाहेर पडत असून, सार्वजनिक, गर्दीच्या ठिकाणी बेजबाबदारपणे फिरताना आढळून येत आहेत. कोविड पॉझिटिव्ह असलो तरी आवश्यक कामानिमित्त बाहेर पडणे नाइलाज असल्याचे काहींचे म्हणणे आहे. परंतु बेजबाबदारपणे सार्वजनिक ठिकाणी फिरण्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, दररोज आकडेवारी वाढत आहे.
घरी जाताना गर्दीत फिरलानवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ येथील बालमाता रुग्णालयात एका ५२ वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नसल्याने डॉक्टरांनी त्यांना गृह विलगीकरण होण्यास सांगितले. रुग्णालयातून निघाल्यावर खरेदीसाठी तो तीन मेडिकल स्टोअरमधील गर्दीत घुसला. त्यानंतर घरी न जाता आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी गेला.
पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या आणि गृह विलगीकरण होण्याच्या सूचना देण्यात आलेले रुग्ण बाहेर फिरत असतील तर अशा रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सुचाना सर्व मेडिकल ऑफिसरला दिल्या आहेत. अशा लोकांबद्दल जास्त सहानुभूती दाखवून चालणार नाही कारण ते स्वतःमुळे दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालत आहेत. कोव्हीड टेस्ट झाल्यावर पॉझिटिव्ह असल्यास आणि गृह विलगीकरण करायचे असल्यास त्याच सेंटरला हातावर शिक्का मारला गेला पाहिजे या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल. - अभिजित बांगर (आयुक्त, न.मुं.म.पा)
मार्केटमधून केली खरेदीकोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने नेरूळ येथील महापालिकेच्या रुग्णालयात एका व्यक्तीने तपासणी केली. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर डॉक्टरांनी गृह विलगीकरणाचा सल्ला दिला. परंतु घरी परताना मार्केटमधून भाजी खरेदी केली. त्यानंतर रुग्ण रिक्षाने घरी गेला.