Coronavirus : कोरोनामुळे भाजीपाल्याचे दरही वाढले, डाळींनी ओलांडली शंभरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 01:07 PM2020-03-28T13:07:52+5:302020-03-28T13:13:41+5:30
Coronavirus : भाजीपाल्याच्या दरामध्ये 40 टक्के वाढ झाली आहे. ग्राहकांची संख्या वाढली की काही किरकोळ विक्रेते चढ्या दराने कृषी मालाची विक्री करत आहेत.
नामदेव मोरे
नवी मुंबई - कोरोनामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होऊ लागली आहे. धान्य, डाळी व कडधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. सर्वच डाळींचे दर शंभरीपार झाले असून भाजीपाल्याचे दरही मोठ्याप्रमाणात वाढू लागले आहेत.
शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचा व नागरिकांना पुरेसे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र कोरोनाचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या साखळीवर ही झाला आहे. मागील एक आठवडा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील धान्य मार्केट पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकले नाही. परिणामी किरकोळ दुकानांमधील धान्याचा साठा संपत चालला आहे. यामुळे शिल्लक माल दुकानदार जादा किमतीने विकू लागले आहेत.
गेल्या आठवड्यात किरकोळ मार्केट मध्ये 28 ते 30 रूपये दराने विकला जाणारा गहू आता 35 ते 40 रूपये दराने विकला जात आहे. ज्वारी 45 ते 50 वरून 50 ते 60 रूपये किलो दराने विकली जात आहे. तूरडाळ 80 ते 100 रूपयांवरून 100 ते 130 रूपये किलो झाली आहे. मुगडाळ 80 ते 100 रूपयांवरून 100 ते 130 रूपये, मसूर डाळ 60 ते 80 रूपयांवरून 80 ते 100 रूपये झाली आहे. नागरिकांकडून मागणी वाढल्याने दुकानदार मनमानीपणे दर लावत आहेत. किरकोळ मार्केट मधील बाजारभावावर शासनाचे कसलेही नियंत्रण राहिलेले नाही. कोरोनामुळे घाबललेले नागरिक मिळेल त्या दराने साहित्य खरेदी करून ठेवत आहेत.
भाजीपाल्याच्या दरामध्ये ही मोठ्याप्रमाणात वाढ होऊ लागली आहे. भाजीपाल्याच्या दरामध्ये 40 टक्के वाढ झाली आहे. ग्राहकांची संख्या वाढली की काही किरकोळ विक्रेते चढ्या दराने कृषी मालाची विक्री करत आहेत. बाजार समिती मध्ये भाजीपाल्याची आवक कधी जास्त तर कधी कमी होत आहे. आवक घसरली की दर दिडपट ते दुप्पट वाढत आहेत. वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. अगोदरच लाॅकडाऊन मुळे उत्पन्न ठप्प झाले आहे. अत्यावश्यक वस्तूंचेही दर वाढल्याने अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडू लागले आहे.
आलेची किंमत दुप्पट
कोरोनामुळे ग्राहकांकडून आलेला प्रचंड मागणी वाढली आहे. दहा दिवसापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आले 40 ते 50 रूपये किलो दराने विकले जात होते. सद्यस्थितीमध्ये आल्याचे दर 100 ते 120 रूपये किलो झाले आहेत. मुंबई मध्ये रोज जवळपास 5 टनपेक्षा जास्त आले ची विक्री होऊ लागली आहे.
किराणा मालाची अनेक दुकाने बंद
जवळपास एक आठवड्यापासून बाजार समितीमधील धान्य मार्केट मधील व्यवहार ठप्प झाले होते. मार्केट अजून पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाही. यामुळे किरकोळ दुकानांमधील साहित्य ही संपत चालले असून अनेक दुकाने बंद झाली आहेत.
Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 5,97,458 लोकांना संसर्ग, 27,370 जणांचा मृत्यूhttps://t.co/BrVeclKT29#CoronaLockdown#CoronaUpdate
— Lokmat (@MiLOKMAT) March 28, 2020
जीवनावश्यक वस्तूंचे दर (प्रती किलो)
वस्तू | एपीएमसी | किरकोळ |
गहू | 24 ते 27 | 35 ते 40 |
ज्वारी | 25 ते 45 | 50 ते 60 |
तूरडाळ | 66 ते 88 | 100 ते 130 |
मुगडाळ | 80 ते 120 | 100 ते 130 |
मसूर डाळ | 55 ते 60 | 80 ते 100 |
भेंडी | 20 ते 40 | 60 ते 80 |
दुधी भोपळा | 15 ते 25 | 30 ते 50 |
फरसबी | 20 ते 30 | 50 ते 70 |
फ्लाॅवर | 10 ते 20 | 50 ते 60 |
गाजर | 15 ते 25 | 60 ते 80 |
गवार | 30 ते 50 | 60 ते 80 |
शेवगा शेंगा | 25 ते 35 | 60 ते 80 |
टोमॅटो | 15 ते 30 | 40 ते 60 |
वांगी | 14 ते 20 | 50 ते 60 |